आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यापीठांतील मराठीचा क्लास होणार डिजिटल; राज्यभरातील ५० प्राध्यापकांनी घेतले विशेष प्रशिक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठात नुकत्याच झालेल्या उजळणी वर्गात (रिफ्रेशर कोर्स) डिजिटल क्लासची अवघड कला मराठीचे प्राध्यापक लीलया शिकले. त्यामुळे राज्यभरातील मराठीचे प्राध्यापक वर्गात डिजिटल तास घेण्यास सज्ज झाले आहेत. वीस दिवसांच्या राज्यस्तरीय उजळणी वर्गात अशा प्रकारचा अनोखा प्रयोग करणारे हे पहिलेच विद्यापीठ ठरले आहे.
१ ते २० सप्टेंबरदरम्यान विद्यापीठाच्या विद्या प्रबोधिनीत राज्यभरातील ५० पेक्षा जास्त मराठी विषयाचे प्राध्यापक एकत्र आले होते. उजळणीवर्गाचे प्रमुख समन्वय प्रा. डॉ. रमेश जाधव यांनी प्राध्यापकांमध्ये अंतर्बाह्य बदल झाल्याची भावना समारोपाच्या दिवशी व्यक्त केली. यूजीसीचा प्रोजेक्ट कसा करावा, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा वापर मराठी पाठासाठी कसा करावा, ऑनलाइन पुस्तक परीक्षण कसे करावे, संगणकावर रिसर्च पेपर कसा करावा यासह अनेक हायटेक तंत्रज्ञान मराठीच्या प्राध्यापकांना प्रथमच शिकावयास मिळाले. या उजळणी वर्गात प्राध्यापकांनी स्वत:ची वेबसाइटही तयार केली. पहिल्या दिवशी बऱ्याच प्राध्यापकांना स्वत:चे ई-मेल अकाउंटदेखील तयार करता येत नव्हते, त्यांना संगणकाचे अद्ययावत ज्ञान देऊन वेबसाइट तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
गडबडले, आजारी पडले
प्राध्यापक शिकण्यापेक्षा शिकवण्याच्या मन:स्थितीत जास्त असतात. त्यामुळे या वर्गात त्यांची चांगलीच भंबेरी उडाली. दहा तासांच्या या वर्गात प्रचंड मेहनत करावी लागली. त्यामुळे काही प्राध्यापक गडबडले, काही नको रे बाबा हा वर्ग म्हणत बडबडले, तर काही आजारीदेखील पडले. या उजळणीवर्गात महिला प्राध्यापकांची संख्या लक्षणीय होती.
दिग्गज सारस्वतांची हजेरी
यात दिग्गज मराठी सारस्वत प्राध्यापकांचा समावेश होता. यात पद्मश्री डॉ. यु. म. पठाण, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. चंद्रकांत वाघमारे (बेळगाव), केशव देशमुख, राजेंद्र गवस (कोल्हापूर), अशोक पळबेकर, डॉ. मोना चिमोटे (अमरावती), रंगनाथ पठारे (अहमदनगर), डॉ. महेंद्र भवरे, अविनाश सांगोलेकर, तुकाराम रोंगटे यांचा समावेश होता.