आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Bhagwan Mahajan's Book Publication In Aurangabad

वेदनेवर मायेची फुंकर घालणारा सच्चा माणूस- माणिकराव देशपांडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सर्वसामान्य रुग्णांच्या वेदना समजून घेत मनाचा सच्चेपणा दाखवणारे आणि त्यांच्या वेदनांवर हळुवार मायेची फुंकर घालणारे डॉ. भवान महाजन यांचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी "मैत्र जिवाचे' आणि "इये गोदेचिये काठी' या पुस्तकात मांडलेली वास्तव परिस्थिती मनाला चटका लावून जाणारी आहे, असे मत निवृत्त ग्रामसेवक माणिकराव देशपांडे यांनी व्यक्त केले.
डॉ. भवान महाजन लिखित दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन शहरातील आयएमए हॉलमध्ये झाले त्या वेळी देशपांडे बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोक बिंदल होते. डॉ. छाया महाजन, जनार्दन पाटील उभेदळ यांची प्रमुख उपस्थिती होती. देशपांडे म्हणाले, डॉ. भवान महाजन यांनी एका सर्वसामान्य व्यक्तीला आयुष्यभर विसरता येणार नाही असा आनंद दिला आहे. विद्यार्थिदशेत त्यांना मी नीतिशास्त्र शिकवले. पण खऱ्या अर्थाने नीतिशास्त्र डॉ. भवान यांच्यात दिसल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. या पुस्तकात रुग्णाची वेदना समजून घेण्याबरोबरच स्पष्टपणे आपले मत मांडणाऱ्या डॉॅ. महाजन यांनी पैठणच्या उद्ध्वस्त झालेल्या वैभवाचे वर्णन केल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. भवान यांनी सर्वसामान्य रुग्णांशी भावनिक नाते आयुष्यभर जपले आहे. माझ्या मुलीवर उपचार करून तिला बरे करताना आम्हालाही ते कधी िवसरले नाहीत. दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या हस्ते करून त्यांनी ही गोष्ट सिद्ध केली आहे.
बिंदल म्हणाले, एक डॉक्टर म्हणून डॉ. महाजन चांगले आहेतच, पण त्याबरोबरच एक लेखक म्हणून रुग्ण आणि डॉक्टरचे नाते कसे असावे याची भावस्पर्शी मांडणी त्यांनी या दोन्ही पुस्तकांत केली. त्यांच्या या पुस्तकाचा अनुवाद आपल्याला करायला मिळाला आणि त्यातूनच आपली नवी ओळख निर्माण करता आल्याचे बिंदल म्हणाले. काही कामे तुम्ही करत नाही तर ती तुमच्याकडून होऊन जातात. असेच काहीसे नाते डॉ. महाजन यांच्यासोबत जोडले गेले आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, डॉ. महाजन एक मनस्वी डॉक्टर लेखक म्हणून त्यांनी लिहिलेल्या या दोन पुस्तकांतील त्यांच्यातील संपन्न अनुभव कथनाचे अभिवाचन पद्मनाभ पाठक, नीता पानसरे यांनी केले. नंदकिशोर मुळे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. परिचय डॉ. चेतन आणि डॉ. अमित महाजन यांनी करून दिला. श्रीकांत उमरीकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. छाया महाजन यांनी आभार मानले.
वेदना जाणून पुस्तकात उतरवल्या
मनोगतव्यक्त करताना डॉ. महाजन म्हणाले, वाचन वाङ्मयाची आवड यामुळे हे पुस्तक आपण लिहू शकलो. सामाजिक जबाबदारी, आजूबाजूचे वातावरण हे चिंता करायला लावणारे आहे. रुग्णांना एक डॉक्टर म्हणून समजून घेण्यापेक्षाही एक माणूस म्हणून त्यांच्या वेदना जाणून घेत सत्य घटना, व्यथा आणि जशाच्या तशा लिहू शिकलो याचा आनंद आहे. घरातील संस्कार आणि अॅड. रावसाहेब महाजन यांनी लावलेली साहित्य वाचन, लेखनाची गोडी यातून लेखन अधिक चांगल्या प्रकारे करत गेलो, असेही डॉ. महाजन म्हणाले.