आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University's Khajina

फारसी भाषेत रंगीत सचित्र भागवत पुराण, पिंपळ पानावर भगवान बुद्धांची चित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दर्शनी भागात असलेल्या इतिहास विभागाच्या संग्रहालयात पुराणवस्तूंचा दुर्मिळ खजिना गेल्या चाळीस वर्षांपासून आहे दडलेला आहे. मात्र, माहितीअभावी हा खजिना पर्यटकांपासून कोसो दूर आहे.
या विद्यापीठातून लाखो विद्यार्थ्यांनी पदवी अन् पदविका घेतल्या, पण हा दुर्मिळ खजिना फार कमी विद्यार्थाना माहीत आहे. सातवाहन, मध्ययुगीन ते मुघल काळापर्यंतच्या अनेक वस्तूंचा प्रचंड संग्रह येथे आहे. दर्शनी भागातील पुराणकालीन नृसिंहलक्ष्मी, विष्णूंची विलोभनीय मूर्ती लक्ष वेधून घेते. पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या काळातील शिसम लाकडाचे देवघर, मुघलकालीन तलवारी-भाले, चिलखत, सातवाहनकालीन मातीची भांडी अन् आतील तीन दालनातील शेकडो पाषाणाच्या शिल्पकृती पाहून मन हरखून जाते.
अवघे पाच रुपये तिकीट : संग्रहालय सकाळी १० ते सायंकाळी ५.३० पर्यंत सर्वांसाठी खुले असते. १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना फक्त २ रुपये, भारतीय पर्यटकांना फक्त ५ रुपये, तर विदेशी पर्यटकांना २० रुपये तिकीट आहे. या संग्रहालयात मोडी लिपीतील दोन हजार पत्रे असून अनेक लढायांची वर्णने आहेत. मुघल व पेशवेकालीन पत्रांचा त्यात समावेश आहे. या ठिकाणी इतिहासात संशोधन करणाऱ्यांसाठी वाचनालय आहे. त्याची फीदेखील फक्त ५० रुपये महिना आहे. अनेक संदर्भ ग्रंथ येथे विक्रीला आहेत. यात दौलताबाद, वेरुळसह अनेक ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारी पुस्तके आहेत.

विद्यापीठाची शान
इतिहास विभागाचे हे संग्रहालय म्हणजे विद्यापीठाची खरोखरीच शान आहे. अनेक दुर्मिळ वस्तूंचा खजिना तेथे आहे. संग्रहालयाची मांडणी नव्याने केली असली तरी जागा अजूनही अपुरी पडत आहे.
डॉ. उमेष बगाडे, इतिहास विभागप्रमुख
सोनेरी वर्ख असलेली सुंदर चित्रे
विद्यापीठाने जतन करून ठेवलेल्या हस्तलिखित रंगीत पोथ्या अन् अनामिक कलाकारांची सोनेरी वर्ख असलेली सुंदर चित्रे हे येथील प्रमुख आकर्षण. उदयपूर-चित्तोडगडच्या राणा राजसिंग यांच्या इच्छेनुसार अनामत राय यांनी भागवत पुराण हा धार्मिक ग्रंथ फारसी भाषेत अनुवादित केला. १०४ पानांचा हा ग्रंथ हस्तलिखीत स्वरूपात असून भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील नेक प्रसंग यात चित्ररूपाने मांडण्यात आले आहेत. नैसर्गिक रंगाचा वापर केल्याने शेकडो वर्षांपासून ही पोथी सुस्थितीत आहे.

डॉ.गुप्ते यांची प्रेरणा
सन १९७३ मध्ये हे संग्रहालय स्थापन करावे, असा प्रस्ताव तत्कालीन इतिहास विभागप्रमुख प्रा.आर.एस.गुप्ते यांनी दिला. त्यांनी अनेकांच्या सहकार्याने पुराणवस्तूंचा मोठा संग्रह जमा केला. पण हे संग्रहालय १९८३ मध्ये झाले. त्यांनतर डॉ. एस. बी. देशमुख व संशोधक रावबहादूर पारसनीस, सरदार भवाने यांनी मोठा संग्रह विद्यापीठाला त्या काळात दिला. इतिहास विभागाने अनेक वर्षे सांभाळला. परंतु जागा कमी पडत असल्याने बराचसा खजिना अजूनही अडगळीत आहे.

पिंपळाच्या पानावर भगवान बुद्धांची चित्रे
पिंपळाच्या पानावर भगवान गौतम बुद्धांची चित्रे विलोभनीय आहेत. ही चित्रे, हस्तलिखिते चिनी कलाकारांची आहेत. यात सोनेरी शाई वापरण्यात आली असून शंभरहून अधिक ही चित्रे आजही सुस्थितीत आहेत.