आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr. Prakash Amte Visited To Siddhartha Park's Zoo

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्राणी प्रेमाचे भुकेले, माणसांचा अजेंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गजराजाने डॉ. आमटे यांना अशी सलामी दिली. छाया : रवी खंडाळकर)
औरंगाबाद- प्राणी प्रेमाचे भुकेले असतात, तर माणसं प्रत्येकाकडून अपेक्षा करतात, त्यांचा कायम अजेंडा असतो, अशा शब्दांत मॅगसेसे पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी माणूस आणि वन्यजीवांतील फरक स्पष्ट केला. प्राणी विनाकारण कुणावर हल्ला करीत नाहीत. प्रेमानं वागलं तर विषारी सापसुद्धा काही करीत नाही, असे सांगत त्यांनी आपले अचंबित करणारे अनुभव सांगितले.
दोन कार्यक्रमांसाठी औरंगाबादेत आलेल्या डॉ. प्रकाश आमटे मंदाकिनी आमटे यांनी आज नातवंडांसह सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. ‘आबा, वाघ’ म्हणत संग्रहालयातील वाघाकडे बोट दाखवणाऱ्या नातवंडांना ते प्राण्यांची माहिती देत होते. प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एच. नाईकवाडे त्यांना प्राणिसंग्रहालयाची आगामी मास्टरप्लॅनमधूनकरावयाच्या सुधारणा यांची माहिती देत होते. प्रत्येक प्राण्याच्या पिंजऱ्यासमोर उभे राहून आमटे यांनी पाहणी केली. मादी बिबट्याच्या पिंजऱ्यासमोर असताना त्या मादीने गुरगुर केली, ती एेकून ते म्हणाले, हा विशिष्ट आवाज आहे. तिला एकटे वाटत आहे. तिला जोडीदाराची प्रतीक्षा आहे....
सर्पालय पाहून झाल्यावर दोन गजराजांना त्यांनी त्यांच्या नातवंडांनी जवळून न्याहाळले. उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या गजराजाने नेमके त्याच वेळी सोंडेत हौदातील पाणी घेत त्याचा जोरदार फवारा उडवत जणू सलामीच दिली. यानंतर उपस्थितांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी प्राणी माणसातला फरक मार्मिक शब्दांत सांगितला. प्राणी कसे धोकादायक नाहीत हे त्यांनी सांगितले. डॉ. आमटे म्हणाले, ‘प्राणी प्रेमाचे भुकेले असतात. त्यांना दुसरे काही नको असते. दुसरीकडे माणूस मात्र प्रत्येकाकडून अपेक्षा करीत असतो. माणसाचा अजेंडा असतो.
माझ्याकडे सगळे प्राणी आहेत. सर्वात हिंसक तरस आहे, तो काही करत नाही. प्रेमाने जबड्यात हात धरतो, लचका तोडत नाही. एक मगर आहे. ३६ वर्षांची. मोठी प्रेमळ आहे. प्रेमानं वागवलं तर विषारी सापसुद्धा काही करत नाही. उलट माणसाचं आहे. माणसांतील रानटीपण तर आपण रोजच पाहतो. आमच्याकडे असणारं माकडाचं पिल्लू एकदा बिबट्याच्या पिंजऱ्यात घुसलं. मला कळलं तेव्हा मी थोडा दूर होतो. धावत आलो आणि आत पाहिलं तर एका टोकाला माकडाचं पिल्लू शांत बसलं होतं, त्याच्यासमोर बिबट्याची मादी बसून होती. लहान पिल्लांना मारू नये हे प्राण्यांना शिकवावं लागत नाही.’
प्राण्यांनाही कंपनी हवी असते
डॉ. आमटे यांनी बारकाईनं निरीक्षण केलं. ते म्हणाले, प्राण्यांनाही एकटं वाटतं. मघाशी अस्वल पाहिलं ना आपण. ते सारखं डोकं हलवत असतं. हे त्याला आलेलं नैराश्य असतं. त्याला कंपनी हवी असते. प्रेमानं वागलं तर माणसालाही प्राणी स्वीकारतात. हे मी अनुभवतो. मी त्यांच्याशी तसाच वागतो. एकदा मी सगळ्या पिंजऱ्यांची दारं उघडली. पण एकही प्राणी बाहेर गेला नाही. कदाचित त्यांना पाहायला आलेली माणसं जास्त धोकादायक असतील म्हणून ते आतच राहिले असतील, अशी टिप्पणीही त्यांनी केली.