आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादला सदस्यत्व नाहीच, डॉ. एम. के. पाटील निवडणूक प्रक्रियेपासून वंचित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन करून उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ करण्याचा मुद्दा आधीच वादग्रस्त आहे. त्यात विद्यापीठाच्या ‘बामुटा’ या शिक्षक संघटनेने निर्माण केलेल्या वादाची भर पडली आहे. उस्मानाबाद उपकेंद्रातील प्राध्यापकांना संघटनेत प्रतिनिधित्व तर काय..? साधे सदस्यही करून घेऊ नये, असा ठरावच शुक्रवारी (३ जुलै) ‘बामुटा’ने घेतला. त्यामुळे सहसचिवपदाचे उस्मानाबादेतील उमेदवार डॉ. एम. के. पाटील निवडणूक प्रक्रियेपासून दूर सारले गेले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ टीचर्स असोसिएशन ‘बामुटा’च्या चार पदांची निवडणूक यंदा बिनविरोध पार पडली आहे. कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांची टर्म संपल्यानंतर डॉ. वाल्मीक सरवदे यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. डॉ. रत्नदीप देशमुख (सचिव), डॉ. रमेश जाधव (उपाध्यक्ष) आणि डॉ. भालचंद्र वायकर यांचीही कोशाध्यक्ष म्हणून यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. मात्र निवडणुकीसाठी नियोजित सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. बामुटाच्या सहसचिव या एकाच पदासाठी मागील एक महिन्यापासून वाद सुरू होता.
संख्याशास्त्र विभागाचे डॉ. सुनील कावळे आणि उस्मानाबाद येथील रसायनशास्त्राचे डॉ. एम. के. पाटील या दोघांचेही अर्ज ‘स्टँड’च राहिले होते. दोघांपैकी कुणीही माघार घेण्यास तयार नसल्यामुळे शुक्रवारी मतदान घेण्याचे सुनिश्चित केले होते. पण उस्मानाबादसाठी बामुटा संघटना नाही, त्यामुळे त्यांना बामुटाच्या बाहेर ठेवण्यासाठी सर्वांनी आग्रही भूमिका मांडली. प्राणिशास्त्र विभागाच्या सभागृहात झालेल्या बैठकीला १७५ पेक्षा अधिक प्राध्यापकांची उपस्थिती होती. डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. माधव सोनटक्के, डॉ. व्ही. एच. बजाज यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
सर्वसाधारण सभेनेच तसा ठराव केला
- संघटनेच्या घटनेत उस्मानाबाद उपकेंद्रातील प्राध्यापकांना सहभागी करून घेण्याविषयी तरतूद नाही. त्यामुळे त्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रश्नच येत नाही. शिवाय तेथील शिक्षकांना प्रतिनिधित्व तर सोडाच, साधे सदस्य करून घेण्यात येऊ नये, असा ठराव सर्वसाधारण सभेने सर्वानुमते घेतला आहे. माझ्या एकट्याचा निर्णय नाही. त्यामुळे सहसचिवांना आम्ही बहुमताने निवडून आणले आहे. त्यांच्या माघारीला अर्थ नाही.
डॉ. वाल्मीक सरवदे, अध्यक्ष, बामुटा
पद हवे होते, पण त्यांनी दिले नाही
- उस्मानाबाद उपकेंद्र तूर्त विद्यापीठाचाच भाग आहे. शिवाय ‘बामुटा’ ही संघटना विद्यापीठातील प्राध्यापकांची आहे. त्यामुळे मी उपकेंद्रातर्फे सहसचिव पदासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांनी उस्मानाबादला प्रतिनिधित्व देण्याचे ठरवल्यामुळे मी बैठकीलाच हजर झालो नाही. प्राध्यापकांमध्ये दुफळी माजू नये म्हणून मी माघार घेतल्याचे पत्र पाठवले होते.
प्रा. डॉ. एम. के. पाटील, उस्मानाबाद उपकेंद्र