औरंगाबाद- इंडियाटुडेच्या वतीने भारतातील पहिल्या ३० विद्यापीठांच्या रँकिंगची घोषणा करण्यात आली आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पहिल्या २० विद्यापीठांत निवड झाली आहे. गेल्या वर्षीच्या ३९ व्या क्रमांकावरून थेट १८ व्या स्थानावर विद्यापीठाने झेप घेतली आहे.
इंडिया टुडेच्या वतीने २०१५ मधील देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची नामांकने नुकतीच घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये विद्यापीठाने हजार ९९७ गुणांसह १८ वे स्थान पटकावले. नॅकचे ‘अ’ मानांकन मिळाल्यानंतर विद्यापीठाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली आहे. या सर्वेक्षणासाठी विद्यापीठाचे नावलौकिक, अकॅडमिक गुणवत्ता, प्राध्यापक, संशोधन प्रकाशने, विद्यार्थ्यांसाठी सोयी-सुविधा, पायाभूत सुविधा, प्रवेश प्रक्रिया, प्लेसमेंटच्या सुविधा, सुरक्षा यंत्रणा आदी घटक लक्षात घेऊन हे गुणांकन करण्यात आले.
महाराष्ट्रातूनदोनच विद्यापीठे यादीत : पहिल्यावीस विद्यापीठांत महाराष्ट्रातून केवळ दोन विद्यापीठांचा समावेश आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि सिम्बायोसिस इंटरनॅशनल विद्यापीठ (पुणे) यांचा समावेश आहे. दिल्ली येथील युनिव्हर्सिटी आॅफ दिल्लीने पहिले स्थान मिळवले.
सर्वांच्या प्रयत्नांमुळे हे यश
प्राध्यापक,कर्मचारी विद्यार्थी यांच्या सामूहिक प्रयत्नातून विद्यापीठाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहे. संशोधनाच्या माध्यमातून विद्यापीठाचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात येत आहे. या वर्षी सर्वेक्षणात विद्यापीठाने पटकावलेले वरचे स्थान ही आमच्यासाठी आनंदाची अभिमानाची बाब आहे.
विद्यापीठाची १८ व्या स्थानावर झेप