आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr. BAMU Educational Exchange With Japan\'s University

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जपानच्या विद्यापीठासोबत आता शैक्षणिक आदान-प्रदान होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि जपान येथील कोयासन विद्यापीठादरम्यान गुरुवारी (१० सप्टेंबर) लेटर ऑफ इंटेंट म्हणजेच सामंजस्य करार करण्यात आला. पाली अँड बुद्धिझम, संस्कृत विषयांतील शैक्षणिक आदान-प्रदान करण्याचा दोन्ही विद्यापीठांमधील मार्ग या करारामुळे मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे आणि कोयासन विद्यापीठाचे अध्यक्ष फुजिता कोकन यांच्यातील स्वाक्षरीने हा करार करण्यात आला.
विद्यापीठात पाली अँड बुद्धिझम हा शैक्षणिक विभाग आहे, तर जपान येथील कोयासन प्रांतामध्ये कोयासन पाली अँड बुद्धिझमचे स्वतंत्र विद्यापीठ आहे. १८८६ मध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठाला १९२६ मध्ये तेथील सरकारने मान्यता प्रदान केली.
फडणवीस यांच्या हस्ते भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीन वाजता कोयासन विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार रामदास आठवले आणि कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, कोयासन प्रांताचे राज्यपाल तथा कुलपती योशिनोबू निसाका यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पद्धतीने फेटे परिधान करून पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत पाली अँड बुद्धिझम, संस्कृत विषयांच्या शैक्षणिक, संशोधनाच्या आदान-प्रदानासंदर्भात परस्पर सामंजस्य करार केला. डॉ. चोपडे आणि कोकन यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. जपान येथील आणखी दोन विद्यापीठांना कुलगुरू डॉ. चोपडे भेटी देणार आहेत. पैकी टोकोशिमा विद्यापीठात यापूर्वीच सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. त्याशिवाय टोकियो आणि ओसाका विद्यापीठात सामंजस्य करार करण्याचे नियोजित आहे. तेथील विद्यापीठांच्या (कुलगुरू) अध्यक्षांशी प्राथमिक चर्चा करून १५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता डॉ. चोपडे शहरात परतणार आहेत.
सामंजस्य करारावेळी कुलगुरू डॉ. चोपडे आणि फुिजता कोकन. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.

शिक्षक-विद्यार्थ्यांना भेटी देण्याचा मार्ग मोकळा
दोन्ही विद्यापीठांच्या सामंजस्य करारात विद्यार्थी आणि शिक्षकांचे कायम आदान-प्रदान करण्याची तरतूद आहे. येथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना जपानला जाऊन तेथील शैक्षणिक, संशोधनाचे अवलोकन करता येईल. शिवाय जपान येथील शिक्षक-विद्यार्थ्यांना येथील विद्यापीठाला भेटी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांनी आपापला प्रवास खर्च करायचा आहे. त्यांच्या निवास, भोजनाचा खर्च मात्र यजमान विद्यापीठांनाच करावा लागणार असल्याचे करारात नमूद आहे.