आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. धनंजय मानेंच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय पेटंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटरचे उपसंचालक डॉ. धनंजय माने यांना ‘अँटी व्हायरल ड्रग्ज’ संशोधनासंदर्भात वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनतर्फे आंतरराष्ट्रीय पेटंट घोषित झाले. जागतिक बौद्धिक संपदा हक्क या अंतर्गत ‘ट्रायअमायनो ट्रायझीन पिकोलिनो नायट्राइल डेरिव्हरिव्हज अॅज पॉटेंट रिव्हर्स ट्राक्सकिषेज इनदिबिर ऑफ एचआयव्ही -१’ यूजीसीच्या या प्रकल्पाअंतर्गत त्यांनी संशोधन केले. डॉ. मानेंच्या संशोधनामुळे औषधी तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एचआयव्हीवर उपाय करणारी सध्या अनेक औषधे अस्तित्वात आहेत; पण एचआयव्ही होऊच नये म्हणून डॉ. माने यांनी संशोधन केले आहे. उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत डॉ. माने यांच्याकडे विद्यापीठातील एचआरडीसीचीदेखील जबाबदारी आहे. महाविद्यालयामार्फत त्यांनी यूजीसीकडे २०१० मध्ये मान्यता मिळवण्यासाठी अर्ज केला होता. २०१३ मध्ये त्यांनी संशोधन पूर्ण केले. १३ ऑक्टोबर २०१५ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी अर्ज केला. २१ एप्रिल २०१६ रोजी पेटंट घोषित झाले. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात पेटंट मिळवणारे आपण पहिलेच प्राध्यापक असल्याचे डॉ. माने यांनी दावा केला अाहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, पर्यावरणशास्त्राचे प्रा. डॉ. एन. एन. बंदेला, भौतिकशास्त्राचे प्रा. डॉ. के. एम. जाधव यांच्या नावावर पेटंट आहेत. त्याशिवाय कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनाही दोन पेटंट मिळाले आहेत. डॉ. माने यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली असून त्यांचे राष्ट्रीय पातळीवर ७० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. संशोधनासाठी डॉ. माने यांनी बेल्जियम, मलेशिया, थायलंड, श्रीलंका, मॉरिशस येथे भेटी दिल्या आहेत.

दोन संयुगे निवडली : डॉ.माने यांनी १६ संयुगे तपासणीसाठी पाठवली होती. पुण्यातील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेअंतर्गत असलेल्या राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेने (नारी) साडेआठ लाख रुपये खर्च केले. १६ पैकी संयुगे त्यांच्या कसोटीवर उतरली असून त्यांनीच पेटंटसाठी पाठपुरावा केला. डॉ. माने यांचे संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावरील असून १४२ देशांमधून हक्क अबाधित करणारे आहे. औषधनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांनी पुढाकार घेतल्यास त्यांच्या संशोधनामुळे एचआयव्ही रोखण्यास मदत होऊ शकते. नारीचे संचालक डॉ. रमेश परांजपे, उपसंचालक डॉ. स्मिता कुलकर्णी संशोधक विद्यार्थी डॉ. संदीप गावडे यांचेही यात योगदान आहे.
बातम्या आणखी आहेत...