आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्त, दूरशिक्षण संस्थेद्वारे वंचितांना उच्च शिक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना उच्च शिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने स्तुत्य उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी शैक्षणिक सत्रापासून (२०१७-१८) ‘मुक्त दूर शिक्षण संस्था’ सुरू करून सर्वसमावेशक शिक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे. 
 
कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या दूरदृष्टीतून हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचीही (इग्नू) मदत घेण्यात येणार आहे. इग्नूचे संचालक तथा नॅशनल काैन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनचे माजी अध्यक्ष डॉ. संतोष पांडा यांना तज्ज्ञ मार्गदर्शक करण्यात आले आहे. तत्पूर्वी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने या संस्थेला मंजुरी दिली आहे. 

उच्चशिक्षणाची संधी 
आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अथवा कौटुंबिक अडचणीमुळे अनेकांना उच्च शिक्षण घेता येत नाही. जबाबदारीतून काहीसे मुक्त झाल्यानंतर पुढे शिक्षण घेण्याची इच्छा निर्माण झाली तरी तशी योग्य संधी मिळत नाही. अशा व्यक्तींना या संस्थेच्या माध्यमातून उच्च शिक्षण दिले जाणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ ओपन अँड डिस्टन्स लर्निंग म्हणजेच आयओडीएल असे संस्थेचे नाव राहणार आहे. माहिती संवाद तंत्रज्ञानामुळे ई-लर्निंग, मॅसिव्ह ऑनलाइन ओपन कोर्सवेअर आणि स्वयंच्या माध्यमातून या क्षेत्रात क्रांतिकारक बदल होताना दिसत आहे. जनसंवाद वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख तथा ज्येष्ठ संवाद तज्ज्ञ डॉ. सुधीर गव्हाणे यांना संस्थेचे संचालक करण्यात आले आहे. 

आज होणार वर्कशॉप 
शनिवारी(७ जानेवारी) सकाळी साडेदहा वाजता महात्मा फुले सभागृहात सेल्फ लर्निंग मटेरियल्स रायटिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. अभ्यासक्रम, पुस्तक लेखन याचे विशिष्ट प्रशिक्षण आवश्यक असते. असे लेखन करू इच्छिणाऱ्या विविध विषयांतील प्राध्यापकांनी या कार्यशाळेत सहभागी होणे अपेक्षित आहे. मुक्त दूर शिक्षणासाठी पुस्तक लेखनाच्या तंत्रावर डॉ. पांडा यांचे मार्गदर्शन होईल. कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक डॉ. गव्हाणे यांनी केले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...