औरंगाबाद - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांची क्रांती चौक ते भडकल गेट रस्त्यावर अलोट गर्दी झाली होती. विविध ठिकाणी लावलेल्या स्टेजवरील गाण्यावर तरुणाई मनमुराद थिरकत होती. यंदाच्या जयंतीसाठी ‘जयभीमाचं नाव जगी गाजतं...भीमाचं गाणं डीजेला वाजतं...’ या गाण्याने एकच रंगत आणली.
विविध पक्ष, संघटना, मित्रमंडळांच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत जिवंत देखावे, विविध कलाकृतींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेकांनी मिरवणुकीतील वाहनांवर सामाजिक संदेश लिहिले होते. यंदा पहिल्यांदाचा रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजीही अनुयायांना बघण्यास मिळाली.
भीमा-कोरेगावच्या जिवंत देखाव्याने मिळवल्या टाळ्या : शाक्यपुत्रक्रीडा मंडळ, भोईवाडातर्फे ढोल-ताशा, झांज पथकाने कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. नागसेन मित्रमंडळाने भीमा कोरेगावचा विजय स्तंभ उभा राहण्यापूर्वी महार सैनिक कसे जिद्दीने लढले याचा देखावा सादर केला. भाजपतर्फे लावण्यात आलेल्या स्क्रीनवर त्याचे सादरीकरण दिसत असल्याने तेथे मोठी गर्दी होती. भाकप, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, यूथ फोर्सच्या मंचावर आर्केस्ट्रा सुरू होता. रिपाइंच्या देखाव्यात मंचावर महालात भगवान गौतम बुद्धांची मूर्ती स्थापित केली होती. महाराष्ट्र सेना, रविराज मित्रमंडळ, विनोद बनकर यांच्या मंचावरही गौतम बुद्धांच्या मूर्ती विद्युत रोषणाईने सजवल्या होत्या.
क्रांती चौक ते नूतन कॉलनी, पैठण गेट, औरंगपुरा, गुलमंडी, सिटी चौकमार्गे भडकल गेटपर्यंत ४५ पेक्षा अधिक संघटनांच्या वतीने स्टेज उभारण्यात आले होते. मिरवणुकीत पँथर्स रिपब्लिकन पार्टी, समता फाउंडेशन, समता सैनिक दल फेडरेशन, रविराज जाधव मित्रमंडळ, भारतीय जनता पक्ष कामगार मोर्चा, विनोद बनकर, भारतीय जनसंघर्ष सेना, बौद्ध महासभा, अनिल बिराटे, संदीप शिरसाट मित्रमंडळ, पोलिस बॉइज, भारतीय जनता पक्ष क्रांती चौक, जवाहर कॉलनी मंडळ, डिफेन्स मूव्हमेंट, महाराष्ट्र सेना, आर. यू. एम, पीपल्स रिपब्लिकन पार्टी यूथ फोर्स, भारतीय दलित फोर्स, आरपीआय, भारतीय भटके आदिवासी संघर्ष महासंघ, दलित पँथर्स, भीमशक्ती सामाजिक संघटना, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, यूथ रिपब्लिकन, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, आरपीआय डेमोक्रॅटिक, बहुजन समाज पक्ष, नागसेन मित्रमंडळ, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, भारतीय कोब्रा, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद उल मुस्लिमीन, राष्ट्रीय क्रांती संघ सकल ओबीसी समाज, युसूफ मुकाती मित्रमंडळ, भारतीय जनता पक्ष गट गुलमंडी, जय श्रीराम मित्रमंडळ गुलमंडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, भारिप बहुजन महासंघ, महर्षी वाल्मीकी, व्यंकटेश परिवार आदी संघटनांनी सहभाग नोंदवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, रामदास आठवले यांनी केलेल्या कार्याचे इंदू मिलच्या जागेच्या अनावरणाची चित्रफीत दाखवण्यात आली. युसूफ मुकाती मित्रमंडळाच्या वतीने टरबूज, खरबूज, अंगूर आणि पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप करण्यात आले.
यंदाही ढोल ताशाचे आकर्षण
साहेब प्रतिष्ठाणचे ७० जणांचे ढोल ताशे पथक होते. यात २२ मुली होत्या. त्यांनी बेटी बचाव, शासकीय योजना, आधारकार्डचे महत्व आदी देखावे सादर केले. मोरया ग्रुप, हितोपदेश क्रीडा मंडळ, संदेश शेळके मित्र मंडळाचे ढोल वादन लक्षवेधी ठरले. अतिशय शिस्तबद्धरित्या या तरुण वादकांनी त्यांची कला सादर केली हाेती.
सामाजिक संदेशाचे देखावे ठरले लक्षवेधी
पोलिसबॉईजच्या स्टेजवरून महिलांनी आपले मुलं, सोनं सांभाळा, मोबाईल सांभाळा, काळजी घ्या. शिस्त पाळा अशा पद्धतीच्या सुचना करण्यात येत होत्या. नगरसेवक कैलास गायकवाड यांनी काढलेल्या वाहनावर डिजिटल बोर्ड लावून शिक्षणाचे खासगीकरण थांबवा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी शिक्षण शेतीचे राष्ट्रीयीकरन करा, दारू सिगारेट, गुटख्याने देश बिघडतो, त्याचे दर वाढवा असे संदेश दिले होते. तसेच संदीप शिरसाट यांच्या स्टेजवर भगवान बुद्धांनी दृष्ट शक्तींवर कसा विजय मिळवला. याचा देखावा केला होता. मानवता आरंभ सेवाभावी संस्थेच्या स्टेजवर एलसीडी लावून त्यातून व्यसन, चोरी,खोटे बोलने, महिला अत्याचार थांबवण्याचे संदेश सुरु होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा,
- मिरवणुकीचे फोटोज..आणि औरंगाबाद व वाळूज परिसरामध्ये साजरी करण्यात आलेली आंबेडकर जयंती...