आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवाद्यांशी दोन हात करणाऱ्या डॉ. आरती सिंह यांच्याकडे नवीनचंद्र रेड्डींचा पदभार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रोजाबाग येथे संशयित अातंकवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या नवीनचंद्र रेड्डी यांनी गडचिरोली आणि भामरागड येथे नक्षलवाद्यांशी दोन हात करणाऱ्या डॉ. आरती सिंह यांच्याकडे औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार शनिवारी दिला. रेड्डी यांची मुंबई शहर पोलिस दलात उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. 

मूळच्या उत्तर प्रदेशच्या असणाऱ्या आणि बनारस हिंदू विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉ. आरती सिंह या २००६ बॅचचा आयपीएस अधिकारी आहेत. आयपीएस अधिकाऱ्याचे प्रशिक्षण संपल्यानंतर त्या दोन महिने औरंगाबाद येथे प्रशिक्षणार्थी म्हणून होत्या. त्यानंतर गडचिरोली येथे कर्तव्य बजावले. या सेवेसाठी त्यांना केंद्र शासनाकडून आंतरिक सुरक्षा पदक आणि राज्य शासनाकडून खडतर सेवा पदक पोलिस महासंचालक पदक मिळाले आहे. भंडारा आणि नागपूर ग्रामीण येथे अधीक्षक पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला अधीक्षक होत्या. 

पोलिस खात्यात महिला अधिकारी म्हणून काम करताना काही अडचणी येतात का याबाबत त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, पोलिस हा पोलिस असतो. त्यात महिला आणि पुरुष असा भेदभाव करणे चुकीचे आहे. मला काम करताना अडचण आली नाही. माझ्या पुढील कार्यकाळात मी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी प्रत्येक कार्यालयात स्वतंत्र महिला समुपदेशन केंद्र सुरू करणार आहे. या बरोबरच पोलिस आणि सामान्य जनतेमधील संवाद वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यातून राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग जातात. त्यावर अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येईल, असे सिंह यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...