आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘झाकोळलेल्या वाटा’ अभावग्रस्त माणसाचं नोंदणी पुस्तक, डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या आत्मकथनावर परिसंवादातील सूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आत्मचरित्र लिहिण्याच्या विविध तऱ्हा असतात. किती लोकांना दुखवायचे, कितींना सुखवायचं हे सांगत लोक लिहितात. ते लिहिले पाहिजे. आपलं दु:ख सांगायचं नाही. मी कोण अशी एक अाध्यात्मिक वृत्ती लेखकामध्ये असते. मात्र मुलाटेंचे लेखन फार संवेदनशील आहे. त्यांचा सुरुवातीचा काळ, अनुभव नितळ आहे. त्या नितळ अनुभवांची आणि अभावग्रस्त माणसाची नोंद करणारे झाकोळलेल्या वाटा हे पुस्तक आहे, असे मत समीक्षक आणि ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे यांनी सोमवारी व्यक्त केले.

ग्रामीण साहित्य चळवळीतून आणि समीक्षेतून सातत्याने विचार मांडणारे प्रगतिशील लेखक डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या “झाकोळलेल्या वाटा या आत्मकथनपर पुस्तकावर परिसंवाद महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रा. डोळे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे होते. या वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी आणि डॉ.महेंद्र कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
प्रा. डोळे म्हणाले, मुलाटे यांना दत्तक म्हणून जाताना आणि दत्तक म्हणून नाकारताना आलेले उपरेपण त्यांना कोवळ्या वयात उद्ध्वस्त करून गेले आहे. आज जिथे आत्महत्या करणाऱ्यांच्या घटना समोर येतात, तिथे परकेपण, दु:ख, संघर्ष भोगूनही आत्महत्येचा विचार कुठेच मुलाटे यांच्या पुस्तकात आलेला दिसत नाही. अस्वस्थ मनाची अनेक चित्रणं मुलाटे यांच्या आयुष्यात आहेत. आत्मसन्मानाची भावना त्यांच्या या आत्मकथनपर पुस्तकात आहे. त्यांनी असेच लिहित राहावे. मुलाटे यांचे तेव्हापासून ते आतापर्यंतचे लिखाण हे फार तर दस्तऐवजासारखे आहे, असेही प्रा.डोळे म्हणाले.
 
श्रीपाद जोशी म्हणाले, मुलाटे यांचे आयुष्य आजपर्यंत फार दु:ख सहन करत गेले असले तरी पुस्तकात फक्त पंचवीस वर्षांचा अनुभव लिहिला गेला असेल. त्यांनी अजून दोन खंड लिहावेत आणि एकंदरीतच आयुष्यात आलेले सर्व अनुभव यात सांगावेत. महेश एलकुंचवार यांनी अलीकडेच आत्मकथनपर लिखाणाबाबत असे सांगितले होते की, त्या पद्धतीतील लिखाणात अपयश, खरे अनुभव येत नाहीत, पण मला ते विधान खोडायचे आहे. मुलाटेंना आलेले अनुभव त्यांनी समर्थपणे मांडले आहेत. हे लिखाण म्हणजे कारागिरी आहे, फोटोग्राफी आहे. चाळीस पुस्तकांचा हा लेखक, समीक्षक आजही साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊ शकला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. प्रगतिशील लेखक ही बिरुदावली मुलाटे मिरवतात, याचा आपल्याला अभिमान असल्याचेही जोशी म्हणाले.
 
याप्रसंगी डॉ. कदम यांनी पुस्तकाविषयी मत व्यक्त करताना सांगितले की, हे पुस्तक आत्मकथेचा भाग नाही. हे एक सुंदर डॉक्युमेंटेशन आहे. अनेकांना यातून बोध घेता येईल. आत्मकथनामागची भूमिका स्पष्ट करताना मुलाटे म्हणाले की, आत्मकथन लिहिणे ही अवघड गोष्ट आहे. कारण दु:ख व्यक्त करताना खरं खरं सांगावं लागतं. प्रत्येक व्यक्तीला आपला जीवनप्रवास मांडावासा वाटतो. मराठी साहित्याला एक चांगले आत्मकथनपर पुस्तक मुलाटे यांनी दिल्याचे मत बोराडे यांनी अध्यक्षीय समारोप करताना मांडले. सूत्रसंचालन प्रिया धारूरकर यांनी केले. कार्यक्रमाला साहित्यप्रेमी आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
 
बातम्या आणखी आहेत...