आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलोख्यासाठी विद्यापीठात हवा शिवरायांचा पुतळा, साहित्यिक डाॅ. ऋषिकेश कांबळे यांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापुरुषांना कधीही जात, धर्म, प्रांत, भाषांमध्ये अडकवू नये. मानवी कल्याणासाठी त्यांनी मार्ग दाखवलेला असतो. छत्रपती शिवाजी महाराजांना तर बाबासाहेबांनी अादर्शच मानले होते. सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांच्या विद्यापीठात महाराजांचा पुतळा बसवणे गरजेचे असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. ऋषिकेश कांबळे यांनी म्हटले अाहे. शुक्रवारी (१ सप्टेंबर) हाॅटेल मौर्य येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पुतळ्याला विरोध करणाऱ्यांना ज्ञान कमी असल्याचीही टीका केली. 
 
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी घेतला आहे. या निर्णयाला काही आंबेडकरवादी संघटनांनी विरोध केला, तर काही संघटनांनी समर्थनही केले आहे. सामाजिक तेढ टाळण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते साहित्यिकांनी सामंजस्याची भूमिका मांडली आहे. विद्यापीठात शिवरायांचा पुतळा उभारण्यास विरोध करणाऱ्यांमध्ये कमालीचे अज्ञान आहे. बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांना अादर्श मानूनच सर्व चळवळी केलेल्या अाहेत.
 
महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व कणखरपणे पुढे अाले. बाबासाहेबांनी धर्मांतरापूर्वी ‘शिवाजी महाराज की जय’, ‘जिजामाता की जय’ अशा घोषणांनी विविध सत्याग्रह केले होते. महाड परिषदेनंतर दुसऱ्या दिवशी बाबासाहेब आपल्या सहकाऱ्यांसह रायगडावर शिवरायांच्या समाधीच्या दर्शनासाठी गेले होते. मुंबईत शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर १९३३ रोजी जाहीर भाषण केले होते. विद्यापीठात पुतळा उभारल्यास सामाजिक सलोखा निर्माण होईल, असेही डॉ. कांबळे यांनी म्हटले. पत्रकार परिषदेला निवृत्त पोलिस उपअधीक्षक दौलतराव मोरे, भीमसेन कांबळे, अमोल दांडगे, जयेश मोरे, सुदाम मगर, हेमंत मोरे उपस्थित होते. 

कुलगुरूंचे नो काॅमेंट्स 
पुतळ्याचा वाद उफाळून अाल्यामुळे कुलगुरू डाॅ. चोपडे चांगलेच अडचणीत अाले होते. पण मागील दोन- तीन दिवसांपासून पीएचडी विद्यार्थ्यांच्या मौखिक परीक्षेसाठी ते पुण्याला गेले होते. शुक्रवारी सकाळी ते विद्यापीठात अाले. दुपारी कुलगुरूंना पुतळ्याच्या वादासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. 
 
‘शिवराय-भीमराय’चीही मागणी 
विद्यापीठात तातडीने शिवरायांचा पुतळा उभारण्याची मागणी जय शिवराय जय भीमराय फाउंडेशनने केली आहे. शिष्टमंडळाने उपायुक्त वर्षा ठाकूर यांना निवेदन दिले. फाउंडेशनचे धनंजय देशमुख, आकाश नरवडे, राहुल पाटील, मयूर विधाते, संदेश पवार, अमित मोरे, पवन खडके, वैभव देशमुख, विकास खरात आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. 
 
तेढ निर्माण होऊ नये म्हणून पुतळा उभारा : आमदार चव्हाणांची राज्यपालांकडे मागणी 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तातडीने उभारण्यात यावा, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव अाणि कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. चार-दोन लोकांमुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी अशा लोकांकडे दुर्लक्ष करावे, असेही त्यांनी म्हटले अाहे. 
 
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय विद्यापीठाने फेब्रुवारी-२०१५ मध्ये घेतला होता. त्या वेळी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तबदेखील झाले अाहे. शिवाय सलग तीन अर्थसंकल्पांत पुतळा उभारणीसाठी निधीची तरतूद करण्यात आली अाहे. तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याबाबत विद्यापीठाकडून दिरंगाई करण्यात अाल्याचा अारोप चव्हाण यांनी केला अाहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भूषण आहेत. वेरूळ येथील भोसले घराणे असल्यामुळे मराठवाड्याच्या मातीशी छत्रपती शिवाजी महाराजांचे एक वेगळे नाते आहे. देशभरातील विविध शहरांत असणारे छत्रपती शिवाजीराजांचे अश्वारूढ पुतळे समाजाला ऊर्जा आणि प्रेरणा देण्याचे कार्य करतात.
 
मध्ययुगीन भारताच्या इतिहासात समता, बंधुता सामाजिक न्यायावर आधारित राजेशाहीत लोकशाही व्यवस्था निर्माण करणारा हा राजा तत्त्ववेत्ते, अभ्यासक, विद्वान, प्रतिभावंत माणसांचा प्रेरणास्रोत राहिला आहे. विद्यापीठात पुतळा उभारला तर नव्या पिढीला ऊर्जा देत राहील, असेही त्यांनी म्हटले. महाराजांच्या पुतळा उभारणीला काही जण विरोध करत आहेत. महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विरोध होणे गैैर अाहे. शिवाय छत्रपतींच्या पुतळ्याला विरोध होण्याची महाराष्ट्रातील पहिलीच घटना असेल. त्यामुळे चार-दोन लोकांमुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून अशा लोकांकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीविषयी तत्काळ निर्णय घेऊन काम सुरू करावे, अशी मागणी चव्हाण यांनी केली. 
बातम्या आणखी आहेत...