आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - शैक्षणिक कामकाजातील 11 सार्वजनिक सुट्या रद्द करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मंगळवारी घेतला होता. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशनने (बामुक्टो) गुरुवारी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांची भेट घेऊन या निर्णयावर आक्षेप घेतला. त्यामुळे 48 तासांतच घूमजाव करत विद्यापीठाने निर्णय फिरवला.
दुष्काळामुळे परीक्षा पंधरा दिवस आधी होणार आहेत. त्यानुसार 7 मार्चपासूनचे वेळापत्रकही जारी केले आहे. पण 6 मार्चपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण होत नसल्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उर्वरित 40 दिवसांत दररोज दोन तास अतिरिक्त घेण्याचे निर्देश देत 6 मार्चपर्यंतच्या 11 सुट्याही रद्द करण्यात आल्या होत्या. बीसीयूडी संचालक डॉ. मुरलीधर शिनगारे यांनी यासंदर्भात 22 जानेवारीला सर्व महाविद्यालयांना परिपत्रकही जारी केले.
पण बामुक्टोचे डॉ. अशोक तेजनकर आणि मुप्टाचे मराठवाडा अध्यक्ष डॉ. शंकर अंभोरे यांच्या शिष्टमंडळाने 24 जानेवारीला कुलगुरूंची भेट घेऊन सुट्या रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. डॉ. शिनगारे यांच्याशी संपर्क साधला असता, हा निर्णय कुलरूंनी घेतला असेल, अद्याप माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. शिष्टमंडळात बामुक्टोचे जिल्हाध्यक्ष डॉ. विक्रम खिल्लारे, डॉ. उमाकांत राठोड, प्रा. एस. एस. पाटील, डॉ. सुजात कादरी, प्रा. उत्तम सूर्यवंशी आदींसह असंख्य प्राध्याकांची उपस्थिती होती.
परीक्षेसंदर्भात या बैठकांत झाला खल- 28 डिसेंबर 2012 च्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याबाबत ठराव पारीत झाला होता. त्यानंतर संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची 10 जानेवारी 2013 रोजी महात्मा फुले सभागृहात बैठक झाली. या बैठकीमध्ये अंबड येथील मत्सोदरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत कटारे यांच्या नेतृत्वात प्राचार्यांची उपसमिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. उपसमितीवर परीक्षांचे वेळापत्रक ठरवण्याचे काम सोपवले गेले. 15 जानेवारी रोजी उपसमितीच्या बैठकीत महत्वाचे निर्णय होऊन 19 जानेवारी 2013 ला परीक्षा मंडळाच्या बैठकीत प्रत्यक्षात परीक्षा पंधरा दिवस आधी घेण्याचा निर्णयाला तत्वत: मंजूरी देण्यात आली. मंगळवारी (22 जानेवारी 2013) बीसीयुडी संचालक डॉ. मुरलीधर शिनगारे यांनी संलग्तिन सर्व महाविद्यालयांना परीक्षांचे आणि अभ्यासक्रम पुर्ण करण्यासंदर्भातील नियोजन एका परिपत्रकाद्वारे कळवले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.