थोर व्यक्तींचे दर्शन घडताना त्यांचे चरित्र शिकवण सदैव स्मरणात राहावी, यासाठी जगभर त्यांचे पुतळे उभारले जातात. परंतु पुतळ्याचा माध्यमातून थोरांचा संदेश समाजापर्यंत पोहाेचवणाऱ्या शिल्पकाराचे नाव मात्र दुर्लक्षीतच राहते. मडिलगेकर कुटुंबियांना चार पिढ्यांपासून शिल्पकलेचा वारसा आहे. गेल्या तीन पिढ्यांपासून बाबासाहेबांचे पुतळे तयार करणारे शिल्पकाराचे माडिलगेकर कुटुंब औरंगाबादेत राहतेय. त्यांना प्रत्यक्ष बाबासाहेबांचा सहवास लाभलाय. यामुळे बाबासाहेबांची शिल्पे साकारताना त्यातील बारकावे, हावभाव, लकब, धीरगंभीरपणा पुतळ्यात जसेच्या तसे उतरतो. बाबासाहेबांवरील श्रद्धेमुळे निपाणी ते औरंगाबाद असा प्रवास करत त्यांनी या महामानवाचे पाचशेच्यावर पुतळे तयार केले आहेत.
मडिलगेकर कुटुंब हे मूळ बेळगाव जिल्ह्यातील निपाणीचे. शिल्पकला, मूर्तिकाम हा त्यांचा वंशपंरपरागत व्यवसाय. बळवंत गोविंद मडिलगेकर (१८६१-१९४०) कोल्हापूर, बेळगाव, हुबळी या ठिकाणी मंदिरातील देवाच्या मूर्ती, गणेश मूर्ती तयार करत. त्यांचे चिरंजीव राजारामबापू बळवंत मडिलगेकर (१९०५-१९८३) यांनी वडिलांच्या पारंपरिक कामात वेगळेपण आणत व्यक्तिशिल्पे साकारण्यास सुरुवात केली. तिसऱ्या पिढीतील सुरेश राजाराम मडिलगेकर आणि दिवंगत सुभाष यांनी यात आधुनिकतेची भर टाकली. चौथ्या पिढीतील बलराज सुरेश मडिलगेकर १५० वर्षांच्या या परंपरेला तंत्रज्ञानाची साथ देण्यास सज्ज झाला आहे.
मिरवणुकीमुळे आकर्षण : एप्रिल१९५० मध्ये राजाराम मडिलगेकर यांच्या पत्नी रुग्णालयात होत्या. मुलगा सुभाष यास शांत करण्यासाठी राजाराम त्यास बाहेर घेऊन गेले. तेथे डॉ. आंबेडकर यांच्या वाढदिवसाची मिरवणूक चालली होती. बाबासाहेबांचे छायाचित्र लावून घोषणा दिल्या जात होत्या. याचे त्यांना आकर्षण वाटले. त्यांनी बाबासाहेबांना भेटण्याचे ठरवले. निपाणीतील तंबाखू व्यापारी बी.एच. वराळे बाबासाहेबांचे कार्यकर्ते होते. राजाराम यांनी त्यांना इच्छा बाेलून दाखवली. त्यांनी जुलैमध्ये दिल्लीत बाबासाहेबांकडे जाणार असल्याचे सांगितले.
भेटीसाठी मंगळसूत्र विकले
दिल्लीला जाण्यासाठी राजाराम यांनी १३५ रुपयात पत्नीचे मंगळसूत्र विकले. दिल्लीत पोहाेचले तेव्हा बाबासाहेब नेपाळला गेल्याचे समजले. राजाराम
आपल्या सोबत मूर्तिकामाचे सगळे साहित्य घेऊन गेले होते. बाबासाहेबांना येण्यास दोन दिवस लागणार होते. या दोन दिवसात त्यांनी गौतम बुद्धांचा पुतळा तयार केला.
सुरुवातीला नकार
राजारामयांनी त्यांचा पुतळा तयार करण्याची इच्छा व्यक्त केली. यास बाबासाहेबांनी नकार दिला. मी असे काय काम केले आहे? माझा पुतळा कशाला करायचा? असे ते म्हणाले. राजाराम यांनी बाबासाहेबांना त्यांच्या रूमकडे येण्याची विनंती केली. गौतम बुद्धांची मूर्ती पाहून बाबासाहेब भारावले.
मिलिंदचे काम
बाबासाहेबांनी राजाराम यांना मिलिंद महाविद्यालयात पुतळे बसवण्याचे काम दिले. त्यानुसार १९५५ मध्ये त्यांना मिलिंदमध्ये ३५ पुतळ्यांची ऑर्डर देण्यात आली. संपूर्ण कुटुंबासह ते औरंगाबादेत आले आणि स्थायिक झाले.
>१९५२मध्ये निपाणीला येणार असल्याचा निरोप राजाराम यांना आला. बाबासाहेबांनी राजाराम यांच्या घराला भेट दिली.
> मडिलगेकरांची बाबासाहेबांचे शिल्प साकारणारे शिल्पकार अशी ख्याती झाली. बाबासाहेबांचे महू, बुद्धगया येथे पुतळे बसवल्याचे मडिलगेकर यांना भूषण वाटते.
चार पिढ्यांची साधना, संपूर्ण देशभरात बाबासाहेबांची पाचशेंच्यावर शिल्पे घडवली
बाबासाहेबांना समोर बसवून साकारला पुतळा : १९५२मध्ये मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयातील ट्रस्टींनी तेथे बाबासाहेबांचा पुतळा बसवण्याचे ठरवले. बाबासाहेबांनी हे काम राजाराम यांना दिले. एकदा पुतळ्यासाठी नाही म्हणणारे बाबासाहेब नंतर स्वत: यास तयार झाले. बाबासाहेब स्वत: राजाराम यांच्यासमोर बसत. दिल्लीत याचे क्ले मॉडेल तयार झाले. तर याची ब्राँझ कास्टिंग मुंबईत करण्यात आली.