औरंगाबाद- मराठी भाषेला संपन्न करणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा मराठी विभाग बंद होण्याच्या मार्गावर आहे. विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण वाढत चालल्याने या विभागाला कुलूप लागण्याची परिस्थिती ओढवत आहे. याला मराठीविषयी अनास्थेसोबत प्राध्यापकांमधील वादविवाद कारणीभूत असल्याचा सूर नामवंत साहित्यिकांनी व्यक्त केला. मात्र, विभाग या विभागावरील संकट टाळण्यासाठी सर्वच मराठीप्रेमींना लढावे लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
येत्या शैक्षणिक सत्रात तर विभाग बंद करावा लागेल की काय, असे प्रशासनाच्या उच्च वर्तुळात बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने काही साहित्यिकांशी संपर्क साधला. साकेत प्रकाशनाचे बाबा भांड म्हणाले, एकीकडे जपानसारखा देश आपल्या मातृभाषेबद्दल पराकोटीचा अभिमान बाळगतो आणि आपल्याकडे मराठीबाबत अनास्थाच असल्याचे दिसून येते. आता हा विभाग वाचवण्यासाठी सर्वांना एकत्रितपणे लढावे लागणार आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना या विभागावर ही वेळ येणे नामुष्कीच आहे असे मत साहित्यिक धनंजय चिंचोलीकर यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी या अवस्थेसाठी प्राध्यापक जबाबदार असल्याचे निरीक्षण नोंदवले. पूर्वी प्राध्यापकांमध्ये मतभेद व असहिष्णुता असली तरी परस्पर सद्भाव टिकून होता. आता असे किस्से कानी पडतात की येथे शिव्यांचा शब्दकोश तयार होऊ शकतो.