आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणींवर मात करून ओमप्रकाश बनले डेप्युटी सीईओ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चाटोरी गावातील (जि. परभणी) डॉ. ओमप्रकाश रामेश्वर रामावत या विद्यार्थ्याने अडचणींचा डोंगर पार केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत एनटीबी प्रवर्गातून राज्यातून प्रथम क्रमांक पटकावून तो यशवंत ठरला आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली आहे. 2013 च्या अंतिम निकालाच्या यादीत त्यांचे नाव जाहीर करण्यात आले.

डॉ. रामावत यांच्या आईचे शिक्षण सातवी, तर बाबा चौथीपर्यंत शिकले. घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे आई शिवणकाम करत असे व बाबा कापडे विकण्याचा व्यवसाय करायचे. मिळणार्‍या जेमतेम उत्पन्नातून घरखर्च, आरोग्य व आमच्या शिक्षणाचा खर्च कसाबसा भागवण्यात येत होता. त्यामुळे प्राथमिक शिक्षण चाटोरी जिल्हा परिषद शाळेतच पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी आईने औरंगाबादला आजोबाकडे पाठवले. गोदावरी पब्लिक स्कूलमध्ये दहावी, एस. बी. कॉलेजमध्ये 12 वीचे शिक्षण पूर्ण केले. मामांचे हडकोत धान्य व पालेभाज्याचे दुकान होते. फावल्या वेळेत मी दुकानात काम करून अभ्यास करत असे. मोठा भाऊ दहावीपर्यंत शिकला. पण दोघांचा खर्च भागवणे आईबाबांना पेलवत नव्हते. हे ओळखून दादाने शिक्षण तेथेच शिक्षण थांबवले अन् आईबाबाला मदत करून दोन पैसे मिळवण्यास सुरुवात केली. त्याच्या मदतीमुळेच सोलापूर शासकीय महाविद्यालयात मला एमबीबीएसचे उच्च शिक्षण पूर्ण करता आले. युरॉलॉजिस्ट म्हणून एक वर्ष प्रॅक्टिस केली. यादरम्यान एमपीएससी परीक्षेची तयारी केली. 2013 मध्ये मी परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात मला यश मिळाले. एनटीबी प्रवर्गातून राज्यातून पहिला क्रमांक पटकावला. याचा मला मनस्वी आनंद झाल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

अनेकांना प्रेरक ठरावी अशी यशोगाथा
‘अन् शृंखला पायी असू दे. मी गतीचे गीत गाई. उगळावयास दु:ख आता आसवांना वेळ नाही’ या बाबा आमटे यांच्या गीताप्रमाणे ओमप्रकाश यांची वाटचाल सुरू आहे. अज्ञानाचा अंधकार भेदून सतत पुढे जाण्याची महत्त्वाकांक्षा आणि त्याला अपार पर्शिमाची जोड देत ते प्रशासनाचा महत्त्वाचा भाग बनले आहेत.

अडचणींपुढे हार न मानल्यामुळे शिक्षणाच्या ध्यासापायी गाव सोडणार्‍या ओमप्रकाश यांचा संघर्ष यशस्वी ठरला आहे. त्यांची यशोगाथा सर्वांसाठी आदर्श ठरावी अशीच आहे, अशी भावना वैष्णव ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष राजेश शर्मा, स्वरूपचंद शर्मा, कांचनप्रसाद, निरंजन शर्मा, भिकुलाल रामावत, श्रीराम रामावत, सागर रामावत यांनी व्यक्त केली आहे.

बाल कुपोषणमुक्तीसाठी प्रयत्न करणार
डॉक्टर झालो असतो तर रुग्ण आल्यानंतरच उपचार करावे लागले असते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जेव्हा मी काम सुरू करेल तेव्हा रोग होऊच नये, यासाठी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना करील. आदिवासी भागात काम करण्याची तयारी आहे. डॉ. ओमप्रकाश रामेश्वर रामावत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.