आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान्यांचे प्रश्न गांधीवादाऐवजी सिस्टिम बदलल्यास सुटतील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गांधीवादाची अंमलबजावणी नव्हे, तर एकूणच सगळी सिस्टिम बदलावी लागणार आहे. पक्ष, व्यक्तिकेंद्रित, जाती, धर्माधारित राजकारण संपवून सिद्धांतावर आधारित राजकारण केल्याशिवाय बदल होऊ शकणार नाहीत, असे मत ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व गांधीवादाचे प्रसारक, प्रचारक डॉ. रामजी सिंह यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.

85 वर्षीय डॉ. सिंह यांची मंगळवारी शहरात दोन व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘महात्मा गांधींच्या विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर, तर दुपारी जेएनइसीमध्ये ‘गांधी विचार : कल भी आज भी’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. देशभर गांधी विचारांचा प्रचार आणि प्रसार करीत या वयातही अथक प्रवास करणार्‍या डॉ. सिंह यांनी या दोन व्याख्यानांच्या दरम्यान ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला. सर्वसामान्यांचे प्रश्न ते गांधीवादाची चिरकालता अशा सर्व बाबींवर प्रकाश टाकताना त्यांनी सध्याच्या राजकारणावर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांच्यासोबत झालेली प्रश्नोत्तरे पुढीलप्रमाणे-

प्रश्न : आजच्या बदललेल्या काळात गांधीवादाचे भवितव्य काय आहे?
उत्तर : गांधीवाद हा अमर आहे. तो संपणारा नाही. उलट आजच्या समस्यांनी वेढलेल्या जगाकडे पाहिले, तर गांधीवाद अधिक उपयुक्त आहे हे दिसते. जगात सगळीकडे गांधीवाद स्वीकारला जात आहे. मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला यांनी गांधीजींच्या विचारांचीच कास धरत आपापल्या देशांत क्रांती घडवली. संयुक्त राष्ट्राने गांधीजींची शिकवण असलेली अहिंसा हा नव्या जगाचा धर्म आहे, हे सांगत गांधी विचार आजच्या जगात कालबाह्य झालेले नाहीत, हेच दाखवून दिले आहे.

प्रश्न : हे जगाबाबत झाले; पण भारतात गांधीजींचा विचार ना राजकारणात दिसतो, ना समाजकारणात..
उत्तर : अगदी खरे आहे. याला कारण म्हणजे आज देशात गांधीजींना दिखाऊ गोष्टींमध्ये अडकवून ठेवण्यात आले आहे. जनतेला आपल्या हक्कांबाबत, अधिकारांबाबत जागे करण्याची गरज आहे. राजकीय चित्र बिलकूल आशादायी नाही, हे खरे असले तरी भारतातील जनता जागृत झाली, तर हे चित्र बदलू शकते.

प्रश्न : शहरातील नागरिकांना रस्ते, पाणी, वीज यांसारख्या साध्या प्रश्नांवर लढावे लागते. तेथे गांधीवादाने हे प्रश्न सोडवता येतील असे वाटते का?
उत्तर : गांधीवाद हा तोडगा नाही. तो विचार आहे. गांधीवाद जगला पाहिजे, असे म्हणण्यापेक्षा लोकशाहीची मूल्ये जगली पाहिजेत, राजकारणातील शुचिता जोपासली गेली पाहिजे. यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मी जात पाहून मत देणार नाही, धर्माधिष्ठित राजकारण करणार्‍यांना मत देणार नाही, गुन्हेगार, भ्रष्टाचार्‍यांना मी निवडून देणार नाही हे जनतेने ठरवले, तर हा बदल निश्चित होऊ शकतो. राजकारण स्वच्छ असावे, असे गांधीजी म्हणत ते हेच आहे.

प्रश्न : राजकारण कसे असायला हवे?
उत्तर : राजकारणात चांगले आणि वाईट यांच्यातील अंतर संपत चालले आहे. या देशात नवे आणि सिद्धांतावर आधारित राजकारण व्हायला हवे. पक्ष अथवा व्यक्तिकेंद्रित राजकारण नसावे, जाती-धर्मावर आधारित राजकारणदेखील व्हायला नको. पक्षाधारित राजकारण अयोग्य आहे, हे मानवेंद्रनाथ रॉय म्हणत, विनोबा भावे म्हणत. अगदी जयप्रकाश नारायणांचेही तसे मत होते. ही माणसे चूक होती, असे कसे म्हणू शकतो?

प्रश्न - व्यक्तिकेंद्रित राजकारण तर जोरात आहे. सोनिया, राहुल, मोदी यांच्याभोवतीच राजकारण फिरत आहे?
उत्तर - हाच व्यक्तिवाद चुकीचा आहे, असे माझे म्हणणे आहे. काँग्रेस असो की भाजप सगळीकडे व्यक्तिवाद दिसतो. सोनिया गांधी, राहुल गांधी म्हणतील, तसे काँग्रेसचे राजकारण चालते, तर मोहन भागवत भाजपच्या कारभारात हस्तक्षेप करून हवे ते घडवून आणतात. वाढत चाललेला व्यक्तिवाद हा धोका आहे.

प्रश्न : मग हे बदल कोण करू शकतो?
उत्तर : जनता निर्णय घेऊ शकते. घेतेदेखील. आणीबाणीच्या काळात आम्ही निवडणुका लढण्याचा विचारदेखील करू शकत नव्हतो; पण लोकांनी भरभरून निवडून दिलेच ना! 35 वर्षांची कम्युनिस्टांची राजवट जनतेनेच उलथवली ना! आणि जनता जागी होत आहे. अन्नसुरक्षा विधेयक जनतेच्या रेट्यामुळेच आणावे लागले. गुन्हेगार राजकारण्यांना अभय देणारा वटहुकूम जनतेच्या रेट्यामुळेच मागे घ्यावा लागला. आधी राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली, मग राहुल गांधी बोलले; पण जनतेच्या मनातील संताप होता हे दिसून आले आहे.

प्रश्न : मग जनतेला पर्याय कोठे आहेत? आम आदमीसारखे पक्ष पर्याय ठरू शकतात का?
उत्तर : जनता पर्याय शोधत असते. तो सापडला की, आपला निर्णय देते. आम आदमी पक्षाबाबत मी फार काही बोलणार नाही. चार दिवसांत तयार केलेला पक्ष आहे. जनतेची ताकद बनवून त्यांनी अण्णा हजारेंसोबत राहायला हवे होते; पण थोडेसे यश मिळाले की, थेट पक्षच काढायची गरज नव्हती. एक दबावगट म्हणून हे संघटन त्यांनी अण्णांच्या पाठीशी उभे करायला हवे होते.