आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वच रोग टाळण्यासाठी योग हा प्रतिबंधात्मक उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मानवास होणारे जवळजवळ सर्वच प्रकारचे रोग दैनंदिन योगासनांमुळे टाळता येऊ शकतात. दररोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मानवी शरीरात वातावरणातील असंख्य विषारी पदार्थ (अॅाक्सिजन रॅडिकल) प्रवेश करतात. सुदर्शन क्रिया या योगप्रकारामुळे अशी विषद्रव्ये शरीरातून नष्ट केली जातात. परिणामी अवयवांच्या पेशींमध्ये रोगप्रतिबंधक शक्ती निर्माण होते आणि ती रोगकारकांचा नायनाट करते.

‘एम्स’च्या जैवरसायनशास्त्रज्ञांनी केलेल्या एका पायलट स्टडीचा हा निष्कर्ष आहे. मूळ भारतीय आणि सध्या अमेरिकेत (मेम्फीस) संसर्गजन्य रोगांचे एक्स्पर्ट म्हणून ओळखले जात असलेले डॉ. मनोज जैन यांनी अॉक्सिजन रॅडिकलवर होणारा योगाचा परिणाम यावर मोठे काम केले आहे. आपण जर आपल्या शरीरातील अॅाक्सिजन रॅडिकल्सची संख्या कमी केली तर निश्चितच आपला अँटिअॅाक्सिडंट स्टेटस (एक प्रकारची रोगप्रतिकारशक्ती यंत्रणा) सुधारू शकतो आणि प्रदीर्घ जगू शकतो, असा दावा डॉ. जैन यांचा आहे. याबाबत औरंगाबादेतील प्रसिद्ध कर्करोग आणि पोटविकारतज्ज्ञ डॉ. उन्मेष टाकळकर म्हणाले, ‘योगामुळे आपण जवळजवळ सर्वच रोगांना रोखू शकतो. कर्करोग होणार हे सांगणारी आनुवंशिक चाचणी केल्यास संभाव्य कर्करोग टाळणे शक्य आहे.’

सुदर्शन क्रिया सकारात्मक
‘एम्स’च्या इन्स्टिट्यूट आॅफ रोटरी कॅन्सर हाॅस्पिटलच्या प्रमुख डॉ. नीता सिंग आणि मेडिकल ओन्कोलाॅजीचे प्रमुख डाॅ. विनोद कोचुपिल्लई यांनी वर्षभर सुदर्शन क्रिया (उज्जयी प्राणायाम) करणाऱ्या ४२ जणांच्या रक्ताचे नमुने तपासले. याच नमुन्यांची तुलना सुदर्शन क्रिया न करणाऱ्या परंतु सुदृढ असलेल्या इतर ४२ जणांच्या रक्तनमुन्यांशी केली. या प्रयोगात असे आढळून आले की, योगासने करणाऱ्या लोकांच्या पेशींच्या हालचालींपेक्षा योगासने अथवा स्ट्रेस मॅनेजमेंट न करणाऱ्या लोकांच्या पेशींच्या हालचाली विपरीत आहेत. अर्थात, योगाभ्यासकांच्या विकरांमधील (एन्झाइम) अॅँटिअॅाक्सिडंट स्टेटस हा सुदर्शन क्रिया न करणाऱ्यांपेक्षा उत्तम असल्याचे आढळले. शिवाय पेशी मृत होण्याचे जास्त प्रमाण हे योगाभ्यास न करणाऱ्यांमध्ये आढळले. पेशी मृत झाल्या तर त्या कॅन्सर पेशींमध्ये (म्युटेशन) परावर्तित होतात. याच पेशी इतर रोगांना जन्म देतात. डाॅ. नीता स्वत: दिवसातून दोनदा सुदर्शन क्रिया करतात.

भरपूर प्राणवायू घेणे हेच निरोगीपणाचे लक्षण
उज्जयी प्राणायाम या योग प्रकारात दीर्घ श्वास घेतला जातो. या वेळी नासिकांमधून वेगाने आणि उच्च दाबाने आॅक्सिजन आत घेतला जातो. घसा आणि भस्रिका आकुंचन आणि प्रसरण पावते. यामुळे Oxygen radicals चे प्रमाण कमी होते आणि रक्तवाहिन्यांतील अडथळे दूर होतात. फुप्फुस जेवढे प्रसरण पावेल तेवढा जास्त प्राणवायू सगळ्या अवयवांना मिळतो, असे डॉ. टाकळकर यांनी सांगितले.

आनुवंशिक कर्करोगाचे प्रमाण १० टक्के
आनुवंशिक कर्करोगाचे प्रमाण १० टक्के आहे. त्यात ब्रेस्ट कॅन्सरसह अनेक प्रकारच्या कर्करोगाचा समावेश होतो. फॅमिली हिस्ट्रीमधून होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण ५ टक्के असून बहिणीला, नातीला असे कर्करोग होत असतात. बीआरसीए या जनुकामुळे आनुवंशिक कर्करोग होतो. मात्र, जेनेटिक कौन्सिलिंग शिबिरात आम्ही आनुवंशिक कर्करोगांचे निदान करतो. ही चाचणी १० ते १५ हजार रुपयांपर्यंत असल्याने कुणी फारशी ती करत नाही. अनेक रोग योगामुळे टाळता येऊ शकतात. तथापि, रोगाच्या शेवटच्या टप्प्यात योग कामी येत नाही. डाॅ. उन्मेष टाकळकर, कर्करोगतज्ज्ञ, औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...