आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रेनेजलाइनचे खोदकाम; केबल आली धोक्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आधी नियोजन, मग काम या मूळ नियमानुसार महापालिका काम करत नाही, याची अनेक उदाहरणे वारंवार समोर येतात. त्यात पुंडलिकनगर येथील ड्रेनेज लाइन स्थलांतराचा समावेश झाला आहे. तेथे ड्रेनेजसाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू झाल्याने बीएसएनएलची भूमिगत केबल तुटण्याच्या मार्गावर आहे. हा प्रकार लक्षात येताच बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. केबल तुटल्या तर पुंडलिकनगर परिसरातील पाच हजार घरांतील टेलिफोन, इंटरनेट यंत्रणेला फटका बसेल. शिवाय केबल अन्य ठिकाणी टाकण्यासाठी मोठा खर्चही येईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना समजावून सांगत त्यांनी काम रोखले आहे.

केंद्र सरकारच्या निधीतून ड्रेनेज यंत्रणा बदलण्याचे काम शहराच्या विविध भागात सुरू आहे. जेथे नवीन पाइप टाकायचे तेथे खोदकामही केले जात आहे. हे काम करताना जमिनीखाली बीएसएनलच्या केबल किंवा जलवाहिनी नाही ना, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने नियोजन करूनच काम करणे अपेक्षित असते. मात्र, आधी काम, नंतर नियोजन अशी गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेची प्रथा आहे. ती पुंडलिकनगरातील कामातही पाळली गेली. परिणामी गजानन महाराज चौक ते जय भवानीनगर मार्गावरील रस्त्याच्या कामादरम्यान रस्त्याच्या मध्यभागी असलेली ड्रेनेज लाइन रस्त्याच्या एका बाजूला स्थलांतरित करण्याच्या कामामुळे बीएसएनएलची भूमिगत केबल तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
परिणामी परिसरातील जवळपास हजारपेक्षा अधिक ग्राहकांची सेवा बंद पडण्याची भीती आहे. गेल्या चार दिवसांत किमान १५० नागरिकांच्या सुविधेवर परिणाम झाला असल्याचे बीएसएनएलचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र अंकुश यांनी सांगितले.गेल्या काही दिवसांपासून गजानन चौक ते जयभवानी नगर रस्त्याचे महानगरपालीकेतर्फे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु रस्त्याच्या मधोमध असलेली ड्रेनेज लाईन रस्त्याच्या डाव्या बाजुला करण्याचे काम सुरू आहे. बीएसएनएलने १५ वर्षापूर्वी मनपाची रितसर परवानगी घेऊन केबल टाकल्या होत्या. परंतु, आता ड्रेनेज लाईनच्या कामासाठी याच जागेवर काम हाती घेण्यात आले आहे. मनपा प्रशासनाने अशाच प्रकारचे काम शहानूरवाडी एकता चौक ते सुतगिरणी चौकात करत असताना ड्रेनेजलाईन रस्त्याच्या मध्यभागीच ठेवली होती. तीच पद्धत पुंडलिकनगरात वापरल्यास रस्ता कामावरील खर्च वाढू शकतो. म्हणून मनपा अधिकारी ड्रेनेजलाईन स्थलांतराचा आग्रह धरत आहेत. ही लाईन रस्त्याच्या मध्यभागीच ठेवल्यास कोट्यवधी रुपयांच्या केबल्स तुटणार नाही आणि ग्राहकांच्या सेवेवर परिणाम होणार नाही, असे अंकुश म्हणाले. दरम्यान, केबल वाचवण्यासाठी मनपा नेमके काय करणार हे जाणून घेण्यासाठी कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.