आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - शहरातील ड्रेनेज यंत्रणेच्या सुधारणेसाठी केंद्र सरकारकडून 365 कोटींचा निधी मिळाल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली. त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी खडबडून जागे झाले आहेत. त्यांनी रविवारी (22 डिसेंबर) एक बैठक घेऊन त्यात निधीचे श्रेय काँग्रेसलाच आहे, असे म्हणत केंद्र व राज्य सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केला.
गेल्या वर्षी महापालिका वर्धापन दिनापूर्वी म्हणजे पाच डिसेंबर 2012 रोजी खैरे यांनी ड्रेनेज यंत्रणेसाठी केंद्र व राज्य सरकारकडे निधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्याला तत्त्वत: मंजुरी मिळाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर मनपाचे सर्व पदाधिकारी खैरे यांच्याच नेतृत्वात पाठपुरावा करत होते. गेल्या आठवड्यात केंद्रीय नगरविकासमंत्री कमलनाथ यांनी 365 कोटी रुपये निधी मंजुरीचे पत्र महापालिकेला पाठवले. त्याचीही माहिती खैरे यांनीच शुक्रवारी (20 डिसेंबर) प्रसारमाध्यमांना दिली होती. त्यानंतर काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्यांना केंद्र सरकारने केलेल्या बहुमोल मदतीची जाणीव झाली. शहराध्यक्ष अँड. सय्यद अक्रम यांनी सोमवारी गांधी भवन येथे आयोजित केलेल्या बैठकीत निधी दिल्याबद्दल चर्चा करण्यात आली. सरचिटणीस राजकुमार जाधव यांनी कमलनाथ तसेच केंद्र व राज्य सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्याला महिला आघाडी शहराध्यक्ष डॉ. विमल मापारी, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष खालेद पठाण यांनी अनुमोदन दिल्यावर प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. या निधीचा योग्य वापर होण्यासाठी सर्वांनी जागृत राहावे, असे आवाहन अँड. अक्रम यांनी केले.
औरंगाबाद शहर टॉप टेनच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दोन हजार कोटींचा निधी देण्याची शिफारस केली होती. मात्र, युतीच्या पदाधिकार्यांनी मनपा ‘ब’मधून ‘ड’ वर्गात नेली. भ्रष्टाचाराने कळस गाठल्याने निधी मिळू शकला नाही, असा दावाही त्यांनी या वेळी केला.
या वेळी मिलिंद पाटील, मुजाहेद पटेल, बबन डिडोरे पाटील, इब्राहिम पटेल, अनिल मुळे, गौतम माळकरी, अशोक पगार, जमील अहेमद, आझम खान, श्रीराम इंगळे, सलीम कादरी, गुरुमीत कौर, विश्ना धामे, बाबा तायडे, निर्मला कुलकर्णी, आनंद भामरे आदींची उपस्थिती होती.
स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार
428 डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिन आहे. त्यानिमित्ताने सायंकाळी पाच वाजता गांधी भवन येथे पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी, स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. त्यास कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष अँड. सय्यद अक्रम यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.