आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागीय क्रीडा संकुलाचा खेळखंडोबा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठवाड्यातील खेळाडूंना सुविधा मिळाव्यात आणि दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत यासाठी सूतगिरणी चौकात विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात आले. येथे रोज सुमारे 250 अँथलेटिक्स सराव करतात. मात्र, ‘आयडिया रॉक्स इंडिया’ या कार्यक्रमासाठी मैदान देण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडूंनाच बाजूला सारण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मोठे आयोजन होऊ नये, अशी क्रीडाप्रेमींची भावना आहे.

शासनाचा जीआर काय म्हणतो?

विभागीय क्रीडा संकुल केवळ क्रीडा कार्यक्रमांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यावर कुठल्याही प्रकारचे इतर कार्यक्रम होऊ नयेत असा शासनाचा अध्यादेश आहे. काही विशेष बाबीत हे मैदान जर दुसर्‍या कुठल्याही कार्यक्रमास द्यायचे असले तर तो प्रस्ताव क्रीडा संचालनालयाकडून मंत्रालयात जाणे अपेक्षित आहे. शासनाकडून होकार मिळाल्यानंतरच हे मैदान वापरण्यास मिळू शकते. मात्र, अशा प्रकारे परवानगी देणे चुकीचे असल्याचे मत खुद्द क्रीडामंत्र्यांनी डीबी स्टारकडे व्यक्त केले आहे.

हनीसिंगचा कार्यक्रम रद्द

गेल्या महिन्यात याच मैदानावर हनीसिंगचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, क्रीडाप्रेमींनी त्यास विरोध केला. त्यामुळे हा कार्यक्रम एनवेळी रद्द करून गरवारे क्रीडा संकुलावर घेण्यात आला. मात्र, या कार्यक्रमाला परनानगी देण्यात आली.

स्टेडियममध्ये खड्डेच खड्डे

मैदानांचे आणि खेळाडूंचे नुकसान होऊ नये यासाठीच स्टेडियमवर इतर कार्यक्रमांना परवानगी दिली जात नाही. आयडिया रॉक्सने स्टेडियमचा खेळखंडोबा केला आहे. आयोजकांनी 12 एप्रिलपासून जागेचा ताबा घेतला आहे. डीबी स्टार चमूने संकुलाची पाहणी केली असता लांब उडीचे पिच खोदण्यात आल्याचे उघड झाले. मैदानात ठिकठिकाणी खड्डेही खोदण्यात आले आहेत. मैदानात थेट जड वाहनांनी प्रवेश केल्याने नाल्यांवरील संरक्षक जाळ्या तुटल्या आहेत. यादरम्यान खेळाडूंना कुठेतरी कोपर्‍यात सराव करावा लागला. विभागीय संकुलाच्या प्रशासनाकडे याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनाच जणू ‘रेड कार्ड’ दाखवत गप्प करण्यात आल्याचे क्रीडाप्रेमींचे म्हणणे आहे.


माहिती मागवतो
विभागीय क्रीडा संकुल हे प्राधान्याने खेळाडूंसाठी आहे. ते जर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी किंवा कुठल्याही कंपनीच्या कॉर्पोरेट इव्हेंटसाठी देण्यात आले असेल तर त्याची माहिती मागवण्यात येईल. मात्र ही बाब चुकीची आहे. याची अधिक माहिती घेतो. कोणी दोषी आढळले तर कारवाई केली जाईल.
अँड.पद्माकर वळवी, क्रीडामंत्री महाराष्ट्र राज्य.


खेळाडूंची संमती महत्त्वाची
मैदान कुठल्याही इतर कार्यक्रमांसाठी देण्याअगोदर खेळाडूंना विश्वासात घेणे आवश्यक आहे. काही विशेष बाबीत विभागीय आयुक्तांना याबाबत अधिकार देण्यात आले आहेत. या मैदानाच्या मेंटेनन्ससाठी निधी उपलब्ध व्हावा याकरिता ते खासगी कंपन्यांना एखाद्या दिवसासाठी मैदान वापरण्यास देऊ शकतात. मात्र, खेळाडूंचा विचार होणे अपेक्षित आहे.
पंकज कुमार, क्रीडा संचालक, महाराष्ट्र राज्य


सर्व परवानग्या घेतल्या

आमची कंपनी अगदी नामांकित आहे. अनेक शहरांत आम्ही हा कार्यक्रम केला आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही नियमांनुसार आवश्यक ती परवानगी घेतो. हा कार्यक्रम आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला आऊटसोर्स केला आहे. या ठिकाणीही त्यांनी निश्चितच परवानगी घेतली असेल.

उपमहाव्यवस्थापक, आयडिया सेल्युलर
थेट सवाल
संजीवकुमार जयस्वाल
विभागीय आयुक्त
* क्रीडा संकुलात व्यावसायिक कार्यक्रमासाठी परवानगी दिली आहे.
क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देता येते. त्यात गैर काहीही नाही.
* हनीसिंगच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती..

हनीसिंग आणि शंकर महादेवन यांची तुलना होऊ शकत नाही. हनीसिंग वादग्रस्त आहे.
* मैदानाचे आणि खेळाडूंचे मात्र नुकसान होत आहे..
क्रीडा उपसंचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शिफारस केली होती. त्यानंतर ही परवानगी देण्यात आली. मैदानाचे नुकसान झाले असेल तर कंपनी भरून देईल. कार्यक्रम झाले नाही तर उत्पन्न कसे मिळणार?