आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाविश्व - औरंगाबादेतच ‘खजुराहो’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कुंचल्यांच्या साक्षीने जगभराचे सौंदर्य टिपण्याचा मोह कलावंतांना आवरताच येत नाही. जगप्रसिद्ध खजुराहो लेणींचे सौंदर्य तर प्रत्येक कलावंताला भुरळ पाडणारे आहे. पिवळ्या आणि काळ्या रंगाचा मेळ घालून खजुराहो लेणींतील शिल्पांची चित्रे गेल्या पाच दिवसांपासून औरंगाबादच्या कलावंतांनी चितारली आहेत. यासाठी खास खजुराहो येथून आलेले स्वामी रामदेव हे चित्रकार कलाकारांना मार्गदर्शन करत आहेत.

वरद रुग्णालयासमोरील काकडे टॉवर्समध्ये सुरू असलेल्या या कार्यशाळेत गणेश, सरस्वती आणि यांच्या चित्रांसह खजुराहोची खास शिल्प जशीच्या तशी चितारण्यात आली आहेत. हॉटेल अमरप्रीत येथे सोमवारी या चित्रांचे प्रदर्शन शहरवासीयांसाठी भरवण्यात येत आहे. चित्रकलेची आवड असलेल्या पूजा आणि सुनीती सोखिया यांनी या कार्यशाळेचे तसेच प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या जगविख्यात शिल्पांचे सौंदर्य शहरातील कलावंतांना साकारता यावे, त्याचे बारकावे लक्षात यावेत हा या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश आहे.

श्रीगणेश आणि विद्येची देवता सरस्वती
कॅन्व्हासवर अ‍ॅक्रॅलिक रंगांचा वापर करत चितारण्यात आलेली ही शिल्पं अतिशय कल्पक आहेत. थोड्या वेळात अनेक छटा कुंचल्याद्वारे सफाईदारपणे कशा कराव्यात याचे उत्तम उदाहरण रामदेव आहेत. कुठल्याही प्रकारचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न घेता रामदेव गेल्या अनेक वर्षांपासून खजुराहोतील चित्रे साकारत आहेत. विलक्षण कसब असलेल्या रामदेव यांनी 50 कलावंतांना पाहता-पाहता तयार केले. प्रारंभी गणेशाची आणि सरस्वतीच्या शिल्पांची चित्रनिर्मिती शिकवण्यात आली. यानंतर लेणीतील लक्षणीय शिल्पे साकारण्यात आली.

आज उद्घाटन
हॉटेल अमरप्रीत येथे दिवसभराचे चित्रप्रदर्शन भरविण्यात येत आहे. पद्मा तापडिया आणि शशिकला सुखिया यांच्या हस्ते चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी सकाळी 11 वाजता करण्यात येईल. दिवसभर चालणारे हे प्रदर्शन सायंकाळी 7 वाजेपर्यंत शहरवासीयांसाठी खुले राहील. याचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो - कार्यशाळेत विविध चित्रे साकारताना चित्रकार. दुस-या छायाचित्रात एका कलावंताने चितारलेले खजुराहोमधील शिल्पाचे चित्र. छाया : रवी खंडाळकर