आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"समांतर'चे अधिकारी म्हणाले, पाइप आणण्यासाठी सोबत चला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मागील सहा महिन्यांपासून नळावाटे ड्रेनेजचे पाणी येत असल्याची तक्रार करूनही काहीच होत नसल्याने संतापलेल्या नवाबपुर्‍यातील नागरिकांनी आज शहागंजमधील पाण्याच्या टाकीवरील औरंगाबाद सिटी वाॅटर युटिलिटी कंपनीच्या कार्यालयाची मोडतोड करत कुलूप ठोकले. या घटनेनंतर पाहणीसाठी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे कंपनीचे सहायक उपाध्यक्ष व्ही. बी. शिवांगी आले; पण आता ‘आता पाइप बदलावे लागतील. आमच्याकडे पाइप नाहीत. जालन्याहून आणावे लागतील. तुमच्यापैकी कुणी आमच्यासोबत आले, तर लगेच आणू. उद्यापासून काम सुरू करू शकतो,’ असे अजब उत्तर शिवांगी यांनी दिल्याने संतप्त नागरिकांनी या दोघांना चक्क काही काळ डांबूनच ठेवले.

आधीच पाणी कमी, त्यात पुन्हा दूषित पाणी, अशी नवाबपुर्‍यातील नागरिकांची अवस्था झाली आहे. मागील सहा महिन्यांपासून या वाॅर्डातील नवाबपुरा, गवळीपुरा, मोंढा, कबाडीपुरा या शहागंज टाकीवरून पुरवठा होणार्‍या भागाला दूषित पाणीपुरवठा होत आहे. नळावाटे ड्रेनेजचे पाणी येत असल्याने हे नागरिक सातत्याने मनपाकडे ओरड करत आहेत; पण ड्रेनेज विभाग समांतरवाल्यांकडे बोट दाखवून अंग झटकतो, तर समांतरवाले ड्रेनेजमुळे ही समस्या असल्याचे सांगत अंग झटकत आहेत. मागील काही दिवसांपासून या नागरिकांचा संताप असह्य होत असताना आज सकाळी सहा वाजता नळाला पुन्हा ड्रेनेजचेच पाणी आले.
अजब उत्तराने संताप
नागरिकांनी तत्काळ पाइपलाइन बदला, अशी जोरदार मागणी केल्यावर औरंगाबाद सिटी वाॅटर युटिलिटीचे व्ही. बी. शिवांगी यांनी हे काम आजच्या आज करता येणार नाही. आमच्याकडे पाइप नाहीत. जालन्याहून आणावे लागतील. दोन दिवसांत काम करू. तुमच्यापैकी कोणी आमच्यासोबत आले, तर पाइप घेऊन येऊ, असे अजब उत्तर शिवांगी यांनी दिले आणि नागरिक संतप्त झाले. एका घरात शिवांगी कोल्हे यांना नेले बसवूनच ठेवले. काम सुरू होईपर्यंत सोडणार नाही, असे सांगत नागरिकांनी पुन्हा त्यांच्यावर सरबत्ती केली.

तोडफोडीनंतर टाळे ठोकले
याप्रकारामुळे संतापलेले नागरिक परिसरात गोळा झाले. त्यात महिला मोठ्या प्रमाणावर होत्या. अफरोज खान, धीरज पवार, मनीष थट्टेकर, अभय हजारे इतर नागरिकांनी एमआयएमचे नगरसेवक फिरोज खान यांच्या कानावर हा प्रकार टाकला. थोड्याच वेळात नवाबपुरा वाॅर्डातील महिला पुरुषांचा ७० ते ८० जणांचा जमाव शहागंजमधील पाण्याच्या टाकीवर गेला. तेथील औरंगाबाद सिटी वाॅटर युटिलिटीच्या कार्यालयात जाऊन कर्मचार्‍यांना जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने हे नागरिक संतापले. त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली कार्यालयाला टाळेच ठोकले. थेट गेटलाच कुलूप लावत त्यांनी कार्यकारी अभियंता कोल्हे समांतरच्या अधिकार्‍यांना तेथे येण्यास सांगितले.

खोदकाम सुरू, पाइपही मागवले
दहा मिनिटांत शिवांगी यांनी सूत्रे हलवली खोदकामासाठी मजूर बोलावले. तसेच जालन्याला पाइपची तत्काळ आॅर्डरही दिली. ते पाइप उद्या येणार आहेत. दुसरीकडे कोल्हे यांनी ड्रेनेजच्या कामासाठी खोदकाम सुरू केले. यानंतर कोल्हे शिवांगी यांची लोकांच्या तावडीतून सुटका झाली.

आपण हे पाणी पिऊन दाखवा
कोल्हे शिवांगी हे दोघे तेथे आले असता नागरिकांनी त्यांना धारेवर धरले. बाटलीत भरून आणलेले दुर्गंधीयुक्त पाणी शिवांगी यांच्यासमोर धरत नागरिकांनी हिंमत असेल तर हे पाणी पिऊन दाखवा, असे आव्हान देत कंपनी काम करत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला.

पाहणीसाठी नेले
आम्ही जलवाहिनी तपासू, असे सांगत कोल्हे शिवांगी यांनी नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला; पण ते ऐकायलाच तयार नव्हते. ते या दोघांना त्या भागात पाहणी करायला घेऊनच गेले. बहुतेक ठिकाणी नागरिकांनी त्यांना दूषित पाणीच आणून दाखवले. ड्रेनेजचे पाणी कुठेतरी जलवाहिनी फुटल्याने त्यात जात असून जलवाहिनी तातडीने बदलण्याची ड्रेनेजची पाइपलाइन बदलण्याची गरज असल्याचे लोक सांगत होते.