आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिण्याच्या पाण्यासाठी एक किलोमीटरची पायपीट; ब्रिजवाडीत पाणी, रस्ते, बंद पथदिव्यांमुळे नागरिक त्रस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वॉर्ड क्रमांक 22, नारेगावअंतर्गत येणार्‍या ब्रिजवाडीत पाण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत. नळाची पाइपलाइन जुनी झाल्याने दूषित पाणीपुरवठा होत असल्याने तो बंद करण्यात आला आहे. नळाला पाणी येत नसल्यामुळे महिलांना एक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.
या परिसरात तीस वर्षांपूर्वी पाण्याची टाकी उभारण्यात आली. सद्य:स्थितीत टाकीत थेंबभरही पाणी नाही. पथदिवे रात्री बंद आणि दिवसा सुरू असतात. रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्याने चोरट्यांचा वावर वाढला आहे. शंभर-दीडशे घरे असलेल्या परिसरात स्वच्छतागृहे उभारण्यात आलेली आहेत, परंतु या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आठ-आठ दिवस स्वच्छतागृहाची सफाई होत नाही. बुद्धविहार आणि मनपा शाळेच्या समोरच पथदिव्यांची केबल उघडी पडल्याने शाळकरी मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. कोणताही मनपा अधिकारी याकडे लक्ष देत नसल्यामुळे ब्रिजवाडीत समस्या कायम आहेत. नागरिकांच्या समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली.

पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागते पायपीट
दिवसा काही ठिकाणी पथदिवे सुरू असतात, तर रात्रीच्या वेळी बंद आहेत. त्यामुळे मोकाट कुत्रे अंगावर येतात. चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. वॉर्डात पथदिवे तरी चालू करावेत.
सरस्वती निकम, रहिवासी

ब्रिजवाडी येथे तीस वर्षांपासून जलकुंभ असूनही पाणी नसल्यामुळे आम्ही त्रस्त आहोत. अधिकारी येतात आणि पाहणी करून जातात. समस्या मात्र कायम आहे.
इंदुबाई घोडके, रहिवासी
४पिण्याचे पाणी आणण्यासाठी भरउन्हात पायपीट करावी लागत आहे. मनपा पाणीपट्टी वसूल करते, तरीही पाणी मिळत नाही. आमच्याकडे नगसेवकही लक्ष देत नाहीत.
नंदा दुर्गिष्ट, रहिवासी

शाळेजवळ धोकादायक उघड्या विजेच्या केबल आहेत. अधिकार्‍यांना भेटूनही काम होत नाही.
चंद्रभागा बोरुडे, रहिवासी

नळाला दूषित पाणी येत असल्याने पिण्याचे पाणी आणण्यासाठी एक किलोमीटर जावे लागत आहे.
विमल मिसाळ, रहिवासी

पाण्याचे कोणतेही नियोजन नाही. नळ कनेक्शन असून पाणी मिळत नाही.
मंगल नेटके, रहिवासी

बंद पथदिवे सुरू करण्यात येतील
समस्या पाहण्यासाठी तत्काळ कर्मचार्‍यांना पाठवतो. त्या ठिकाणचे बंद पथदिवे सुरू करू. - पी. आर. बनसोडे, उपअभियंता विद्युत विभाग, मनपा

स्वच्छतागृहाची सफाई आणि इतर परिसरातील सफाई करण्यासाठी स्वच्छता कर्मचार्‍यांना सूचना देतो.
अंकुश लाड, वॉर्ड अधिकारी

पाण्याची जुनी पाइपलाइन आहे, ती बदलावी लागणार आहे. त्या भागात पाणी येत नसल्याची पाहणी करण्यात येईल.
अशोक पद्मे, उपअभियंता