आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅम्ब्युलन्स रस्त्याच्या डाव्या बाजूला ठेवण्याविषयी चालकच अनभिज्ञ, प्रशिक्षणाची गरज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रुग्णांना तत्काळ रुग्णालयात पोहोचवण्यासाठी अॅम्ब्युलन्स सेवा आहे. ती ट्रॉमा सेंटरपर्यंत वेळेत पोहोचावी, यासाठी सर्व वाहनधारकांनी रस्ता डाव्या बाजूने मोकळा करून देणे अपेक्षित आहे. शिवाय डाव्या बाजूला वळण्यासाठी रस्ताही चांगला असायला हवा. पण या दोन्ही बाबींची औरंगाबाद शहरात कमतरता आहे. अॅम्ब्युलन्सला वाट मोकळी करून देण्याइतकी संवेदनशीलता अनेक वाहनचालक दाखवत नाहीत. दुसरीकडे डाव्या बाजूची वळणे धोकादायक असल्याने जीवनदायी सेवेला मोठा अडथळा निर्माण होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रस्त्याच्या डाव्या बाजूनेच अॅम्ब्युलन्स ठेवली पाहिजे, हे अनेक अॅम्ब्युलन्स चालकांनाच माहिती नसल्याचे दिव्य मराठी प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत समोर आले. 

विदेशात अवघ्या पंधरा मिनिटात अपघातग्रस्तांना अॅम्ब्युलन्सद्वारे ट्रामा सेंटरपर्यंत पोहोचवले जाते. हा वेळ आणखी कमी करण्यासाठी तेथे प्रयत्न होत आहे. भारतात राज्य राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे रुग्णांना विनाविलंब अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात येते. शिवाय खासगी हॉस्पिटल्स, राजकीय, सामाजिक संस्थाही अॅम्ब्युलन्स सेवा देतात. घटनेची माहिती मिळताच पंधरा मिनिटांत अॅम्ब्युलन्स रुग्णापर्यंत पोहोचायला हवी. औरंगाबादेत हे प्रमाण पाच किलोमीटरसाठी २० ते ३० मिनिटे आहे. 

डाव्या बाजूचे वळण रस्ते खड्डेमुक्त होणे गरजेचे, वाहनधारकांना शिस्त लावण्याची गरज
- नगर नाका, बाबा पेट्रोल पंप ते चिकलठाणा मार्गावरील उड्डाणपूल सोडल्यास उर्वरित दोन्ही रस्त्यांची डावी बाजू खराब झालेली आहे. रेल्वे स्टेशन ते (महावीर चौक, आमखास मैदानासमोरील उड्डाणपूल वगळता) हर्सूल टी पाॅइंट, आकाशवाणी चौक ते बीड बायपास, वाळूज ते घाटी, एमआयडीसीतील डाव्या बाजूचे वळण रस्ते बहुतांश कच्चे खराब आहेत. 
- अंतर्गत रस्ते अरुंद. शिवाय त्यावर हातगाड्या, वाहने उभी केली जातात. 
- सिडकोबसस्थानक ते गजानन महाराज मंदिर, रेल्वे स्टेशन, मंदिर, चेतक घोडा चौक, त्रिमूर्ती चौक अरुंद रस्ते, त्यावर वाहन पार्क केलेेली असतात. बहुतांश ठिकाणी व्यापाऱ्यांचे साहित्य मांडलेले असते. 
- बीड बायपास, जालना, जळगाव आदी रस्त्यांवर पोलिसांनी डाव्या बाजूने जाता यावे यासाठी बॅरिकेड्स लावले आहेत. पण वाहनधारक तेथेच उभे राहतात. 

रोज तारेवरची कसरत : चालक 
शहरातीलअंतर्गत रस्ते खूपच अरुंद आहेत. त्यावरून रुग्णाला घेऊन जाताना रोज तारेवरची कसरत करावी लागते. मुख्य रस्त्यावरही काही वाहनचालक रस्ताच देत नाहीत. दिला तर ते काही क्षणात पाठीमागून वेगात येऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. आम्ही उजव्या बाजूने अॅम्ब्युलन्स चालवण्याचा प्रयत्न करतो. पुणे, मुंबईत वाहनधारक त्वरित रस्ता मोकळा करून देतात. रस्तेही चांगले आहेत. आपल्याकडे दोन्हींचा अभाव आहे. आम्हाला आरटीओ, पोलिस प्रशासनाकडून प्रशिक्षण, माहिती दिली जात नाही. स्वत:च अनुभवातून शिकावे लागते. मात्र, कोंडीत अडकल्यावर पोलिस तत्परतेने मदत करतात, असे अॅम्ब्युलन्स चालक शरद पाटील, सीताराम लहाने, विलास खोतकर, बाबासाहेब डोंगरे, समाधान पाटील, रोहिदास बोगणे, बाळू चांदर यांनी सांगितले. 

जनतेने जागृत व्हावे 
अॅम्ब्युलन्सला मार्ग देणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. पण त्याचे भान राहिलेले नाही. यासाठी पोलिसांनी वाहनचालकांमध्ये जागृती करावी किंवा कारवाई केली पाहिजे. डाव्या बाजूंची वळणे अॅम्ब्युलन्ससाठी सोयीची असतील, याची काळजी मनपाने घ्यावी. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला पाहिजे. 
- एन.के. त्रिपाठी, परिवहन तज्ज्ञ, भोपाळ. 

डाव्या बाजूने जावे 
उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे अॅम्ब्युलन्स सेवेसाठी रस्त्याची डावी बाजू निश्चित केली आहे. अॅम्ब्युलन्स चालकांनी डाव्या बाजूनेच चालले पाहिजे. यासाठी मुख्य सिग्नलवर बॅरिकेड्स लावली आहेत. बीड बायपासवर पोस्टर्सही आहेत. जनजागृती आवश्यक आहे. 
- सर्जेराव शेळके, सेवानिवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी.
बातम्या आणखी आहेत...