आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाडा विभागातील 14 तालुके अवर्षणग्रस्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मान्सूनचे तीन आठवडे उशिरा आगमन झाल्याने पेरणीदेखील उशिरा करण्यात आली. मराठवाड्यात 104 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. 14 तालुक्यांत 50 टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. अपु-या पावसाने चिंता वाढली आहे. पाणी आणि चा-यावर 30 जुलैपर्यंत 32 लाख 29 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.
पर्जन्यमान कमी झाल्याने मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर झाली आहे. विहिरी, धरणे, तलाव, बोअरवेलमध्ये अल्पसाठा शिल्लक आहे. भोकर 10, उस्मानाबाद 109, परांडा 15 आणि ग्रामीण भागातील 423 टँकर असे 557 टँकरद्वारे 12 लाख 4 हजार 630 लोकांना पाणीपुरवठा करण्यात आला आहे. यासाठी 18 लाख 45 हजार रुपये खर्च सरकारने केला आहे. अपु-या पावसाने जनावरांना जंगलात चारण्यायोग्य चारा उपलब्ध झालेला नाही. जनावरांना चारा पुरवण्यासाठी सरकारच्या वतीने 385.53 मेट्रिक टन कडबा पेंढ्या आणि 16657.52 मेट्रिक टन ओला चारा उपलब्ध करून दिला आहे.
लवकर समाधानकारक पाऊस न आल्यास परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची माहिती विभागीय सांख्यिकी कृषी अधिकारी सतीश शिरडकर यांनी दिली.