औरंगाबाद - मूळातच अत्यल्प पावसाळा झाला. परतीच्या पावसानेही दगा दिला. त्याचा थेट परिणाम रब्बीच्या पेरणीवर झाला असून, औरंगाबाद, जालना आणि बीडमध्ये ज्वारीची केवळ २६ टक्केच पेरणी झाली. ७४ टक्क्यांनी हा पेरा घटला आहे. पाण्याअभावी यापुढे पेरणी दुरापास्त असून, उत्पादन घटणार आहे. यंदा धान्य, पाणी, चाराटंचाई भीषण स्वरूप धारण करणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. अन्नधान्ये व चार्याचे भाव भडकतील.
मान्सून उशिरा आल्याने खरीप पेरणी लांबली. काढणीसही विलंब झाला. त्यातच सरासरीपेक्षा यंदा ३० ते ५० टक्के पाऊस कमी पडला. परतीचा पाऊसही झाला नाही. पेरणीयोग्य पावसाअभावी २६ टक्के म्हणजेच ५ लाख ६२ हजार ४०० हेक्टरपैकी १ लाख ४५ हजार ८०० हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. या २६ टक्के पेरणीतूनही ज्वारीचे फार उत्पन्न होण्याची शाश्वती नाही. संभाव्य दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकर्यांनी पाण्याचा योग्य वापर करून चारा पीक जगवण्यासाठी पुढे येण्याची गरज कृषितज्ज्ञांनी व्यक्त केली.
ज्वारी, चार्याचे उत्पादन घटणार
हेक्टरी सरासरी १५ ते २० क्विं. ज्वारी व १२ ते १५ टन चारा मिळतो. विभागात ४.१६ हेक्टरवर पेरणी होऊ शकली नाही. हेक्टरी १५ क्विंटल उत्पन्न धरले तरी ६२.४९ लाख क्विंटल ज्वारी व ४९.९९ लाख टन चारा उत्पादन घटेल.
यंदा जास्त घट, उत्पादनाला फटका
ज्वारी पेरणीचा काळ १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर असा असतो; काही ठिकाणी १५ नोव्हेंबरपर्यंत पेरणी होते. पेरणी न झालेले क्षेत्र ७४ टक्के एवढे आहे. त्यामुळे उत्पादनातही घट होणार आहे. - रमेश गोसावी, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी.
ज्वारीचा भाव ३५ रुपये किलो होईल
पेरणी न झाल्याने ज्वारीचा मोठा तुटवडा भासेल. सध्या मोंढ्यात दीड ते २ हजार रुपये क्विंटल ज्वारीला भाव आहे. आगामी काळात ज्वारी ३५ रुपये किलो होण्याची शक्यता नाकारता येत नाही. - नानासाहेब अधाने, सचिव, औरंगाबाद बाजार समिती.
इतर पिकांची स्थिती अशी
- गहू, करडईची पेरणी १% - जवस, सूर्यफुलाची पेरणीच नाही. - कमी पाणी लागणारा हरभरा १४% - मका पेरणी २१ % - आता पाऊस पडला, तर गव्हाची पेरणी वाढेल.