आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- राज्यात दुष्काळ असल्याने यंदा आंब्याचे उत्पादन 50 टक्क्यांनी घटण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. कमी उत्पादनाचा परिणाम किमतीवर झाला असून आंब्याचा प्रतिकिलो दर 60 ते 200 रुपयापर्यंत पोहोचला आहे. दरवर्षी मे महिन्यात आंब्याचे दर कमी-कमी होत जातात. परंतु, या वर्षी उत्पादन घटणार असल्याने किमतीत वाढ होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
यंदा आंब्यांची आवक कमी झाल्याने आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड या राज्यांतून तसेच कोकणातून आतापर्यंत 4 हजार 93 किं्वटल आंबा शहरात दाखल झाला आहे. जिल्ह्यात दरवर्षी 2 हजार 240 हेक्टरवर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. अनुकूल वातावरणात हेक्टरी 5 ते 6 टन सरासरी उत्पादन घेतले जाते. या वर्षी 45 टक्के पाऊस कमी पडल्याने आंब्याच्या मोहरावर परिणाम झाला आहे. फळधारणेच्या काळात फळझाडांना पाण्याची जास्त गरज असते. मात्र, याच काळात झाडांना पाणी मिळाले नाही. यामुळे फळझाडे जळून खाक झाली आहेत, तर चांगल्या स्थितीत असणार्या झाडांचा मोहर, फळे गळून पडली आहेत. फळांचा आकार, गोडवाही कमी झाला आहे.
कमी पावसाचा परिणाम
मागील वर्षी उत्तरेतील थंड वारे भारतात उशिरा दाखल झाले. मार्चपर्यंत थंडीची लाट होती. यामुळे आंब्याला तीन टप्प्यांत मोहर लागला होता. थंडीचा अल्प परिणाम झाल्यामुळे उत्पादन क्षमतेत 25 टक्के घट झाली होती. यंदा 45 टक्के पाऊस कमी झाला आहे. यामुळे भूगर्भातील पाणी पातळी दोनशे फुटांपेक्षा अधिक खोल गेली आहे. याचा दुष्परिणाम आंब्याच्या बागांवर होत आहे.
उत्पादनात होणार घट
कमी पर्जन्यमानामुळे फळ उत्पादनांवर परिणाम झाला. उत्पादनात 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट होण्याची शक्यता आहे. फळबागा वाचवण्यासाठी एकरी 15 हजार रुपयांची मदत देत आहोत.’’
- पंडित लोणारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
बाग जळून खाक
दोन एकर बाग जळून खाक झाली. उर्वरित बागेतून 30 ते 40 टक्के उत्पादन होण्याची शक्यता आहे. शासनाने एकरी 15 हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई मिळावी.’’
- त्र्यंबक पाथ्रीकर, आंबा उत्पादक शेतकरी.
किरकोळ बाजारातील आंब्याचे दर
आंबा दर (किलोमध्ये)
हापूस 150 ते 200
केशर 150 ते 120
लालबाग 80 ते 100
पायरी 80 ते 100
बदाम 60 ते 100
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.