आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी उद्योजक-व्यापारी सरसावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दुष्काळी परिस्थितीमुळे एक हजार गरीब विद्यार्थ्यांना सीएमआयए आणि व्यापारी महासंघाच्या वतीने दरमहा एक हजार रुपये देण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. 750 विद्यार्थ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. याशिवाय केअरिंग फ्रेंड्स या मुंबईच्या संस्थेने 350 विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पाच लाख रुपये दिले आहेत.

सीएमआयएचे सचिव डॉ. मुनीष शर्मा, उपाध्यक्ष मिलिंद कंक यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, सीएमआयए आणि व्यापारी महासंघ यांनी एकत्र येत अशा इतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत किमान दोन वेळच्या जेवणासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. एकूण 30 लाख 61 हजार रुपये जमा झाले आहेत. त्यातून औरंगाबादेतील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या 41 महाविद्यालयांतील गरजूंना मदत दिली जाईल. महाविद्यालयांकडून यादी मागवण्यात आली असून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांत ही रक्कम जमा केली जाईल. सातार्‍यातील डॉ. अविनाश पोळ जालना जिल्ह्यातील कामांसाठी 10 लाख रुपये देत असून तलावांतील गाळ काढण्यासाठी 2 नवे जेसीबी देण्याची त्यांची तयारी आहे. पत्रकार परिषदेला व्यापारी महासंघाचे मानद सचिव मनोज राठी, सचिव हरी सिंग उपस्थित होते.

1 हजार जणांना देणार काम
मिलिंद कंक म्हणाले, दुष्काळामुळे स्थलांतर करणार्‍यांपैकी 1 हजार जणांना तात्पुरते काम देण्याची तयारी उद्योजकांनी दर्शवली आहे. डॉ. मुनीष शर्मा म्हणाले की, दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सीआयआय आणि सीएमआयए यांनी एक संयुक्त निधी उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यातून तलावांतील गाळ काढणे, पाण्याची वाहतूक, पाण्याची साठवणूक, चारा छावण्या यांना मदत केली जाईल. दूषित पाण्यामुळे रोगराई पसरू नये यासाठी गरजेनुसार फिल्टर देण्यात येतील.