आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- मराठवाड्यात दुष्काळामुळे खेड्यातील लोकांची पाण्यासाठी होणारी परवड पाहून मायानगरी मुंबईतील दोन महाविद्यालयीन युवकांचे मन हेलावले. आपण या लोकांसाठी काही तरी करायलाच पाहिजे या विचाराने झपाटलेल्या या मित्रांनी आपल्या पाकीट मनीतून खारीचा वाटा उचलण्याचा विचार केला. दोघांकडे मिळून 10 हजार रुपये होते. जवळच्या मित्र परिवाराकडून आणखी पैसे जमा केले आणि या 15 हजार रुपयांतून औरंगाबाद जिल्ह्यातील अंजनडोह या गावातील ग्रामस्थांची पाण्यासाठी सुरू असलेली पायपीट थांबावी म्हणून एक महिन्यासाठी टँकर बुक केले. गुरुवार (9 मे) पासून ही टँकर सेवा सुरू झाली आहे.
शालेय जीवनापासून मित्र असलेल्या सौरभ सुनील मंगरुळे आणि मयूर विलास नलावडे यांचा हा भगीरथ प्रयत्न अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. सौरभ डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला, तर मयूर बी. कॉमच्या प्रथम वर्षात शिकत आहे. या उपक्रमाबद्दल सौरभ म्हणाला, एका वृत्तवाहिनीवर दुष्काळावरील विशेष कार्यक्रम पाहिला. त्यात पाण्याअभावी मराठवाड्यातील जनतेच्या होणार्या हालअपेष्टा पाहून अस्वस्थ झालो. त्याक्षणी मदतीचा निर्णय घेतला. याबाबत मयूर, इतर मित्र व नातेवाइकांना सांगितले. सर्वांनी मदतीची तयारी दाखवली. पाकीट मनीतून मी पाच हजार रुपये जमा केले होते. तसेच मयूरने दोन हजारांची भर घातली. इतरांच्या मदतीने 15 हजार रुपये जमले. रक्कम कमी होती, परंतु तरीही ही छोटीशी मदत दुष्काळग्रस्तांपर्यंत कशी पोहोचवायची हा मोठा प्रश्न होता. ही समस्या फेसबुकने सोडवली. माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये औरंगाबादमधील विशाल करोळे आहेत. मी त्यांच्याकडे दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनीही तितक्याच तळमळीने मदतीची तयारी दाखवली. इतक्या कमी रकमेतून मदत कशी करायची यावर विचार झाला. त्यानंतर विशाल सरांनी अंजनडोहला एक महिना पुरेल इतके पिण्याचे पाणी देता येईल, असे सांगितले. त्यानंतर सर्व जण शहरापासून 40 किलोमीटर दूर असणार्या अंजनडोहला पोहोचले आणि हा उपक्रम सुरू झाल्याचे सौरभने सांगितले.
गावकर्यांना मिळणार स्वच्छ पाणी
अंजनडोहवासीयांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते, परंतु यंदा तर पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष आहे. गावापासून दोन किलोमीटरवरील एका शेततळ्यात असणार्या विहिरीतील गढूळ पाणी त्यांना दिले जाते. हे पाणी पिण्यायोग्य नाही. आजवर गावकर्यांनी या पाण्यावरच गुजराण केली; पण सौरभ आणि मयूरच्या मदतीतून आता आठवड्यातून दोनदा त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणार आहे.
ही तर मोठी मदत
दुष्काळात होरपळत असताना या मुलांनी मुंबईहून येऊन केलेली मदत सरकारी यंत्रणेपेक्षा मोठी आहे. मुंबई, पुण्यातील तरुण पिढी आजही गावाला विसरलेली नाही हेच या मुलांच्या मदतीतून सिद्ध होते. त्यांचे शतश: आभार.
-दीपक शेजूळ, ग्रामस्थ.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.