आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठीचे साडेतीन कोटी रुपये पडून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सरकारने दुष्काळग्रस्त गावातील बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची घोषणा केली, परंतु निकाल जाहीर होऊन चार महिने उलटूनही विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ मिळालेला नाही. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे विभागातील विद्यार्थ्यांसाठी दिलेले साडेतीन कोटी रुपये वाटपाअभावी पडून आहेत.
गेल्या तीन-चार वर्षांत पावसाअभावी दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे दहावी, बारावी परीक्षेचे शुल्क माफ करण्याची घोषणा शासनाने केली होती. दुष्काळग्रस्त गावातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी करण्यात आली. बारावीच्या विद्यार्थ्यांकडून घेतलेले शुल्कही परत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबत माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मराठवाड्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होऊनही चार महिने संपले, तरी टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करण्यात आले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांची माहिती दिलेली नाही. शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडूनही सहकार्य होत नसल्याने तिजोरीत निधी असतानाही विद्यार्थ्यांना त्याचे वाटप होऊ शकलेले नाही. अनुदान आणि इतर शुल्कांच्या रकमेसाठी विद्यार्थ्यांना भंडावून सोडणारी शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत देण्यात मात्र चालढकल करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

याद्या मंडळाकडे केल्या सादर
^बहुतांशशाळांनी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या याद्या मंडळाकडे सादर केल्या आहेत. काही शाळांकडून विद्यार्थ्यांची माहिती येणे बाकी आहे. त्या शाळांनाही सूचना दिलेल्या आहेत. ज्या शाळा माहिती देणार नाहीत त्यांच्यावर शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत कारवाई करण्यात येईल. -भाऊसाहेब तुपे, शिक्षण उपसंचालक,

केवळ ३७६५ विद्यार्थ्यांना लाभ
बारावीच्या निकालानंतर परीक्षा शुल्काची रक्कम परत करण्याची प्रक्रिया शिक्षण मंडळाने सुरू केली. मात्र आजपर्यंत केवळ हजार ७६५ विद्यार्थ्यांच्याच बँक खात्यांवर परीक्षा शुल्काची रक्कम जमा करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागात फेब्रुवारी-मार्चमधील बारावीच्या परीक्षेसाठी तब्बल लाख ४२ हजार ४२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांच्या बँक खात्यांची माहिती कनिष्ठ महाविद्यालयांनी शिक्षण मंडळाला द्यावयाची आहे. याबाबत वारंवार सूचना देऊनही विद्यार्थ्यांच्या याद्याच मिळाल्या नसल्याचे मंडळातील सूत्रांनी सांगितले. शिक्षण विभागाच्या ढिम्म कारभारामुळे दुष्काळात होरपळणाऱ्या विद्यार्थ्याचे आर्थिक नुकसान होत आहे.

बातम्या आणखी आहेत...