आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Drought Responsibility On Ministers, But Not Minister Shivsena Mrathawada Regions

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळ निवारणाची जबाबदारी मंत्र्यांवर, पण सेनेकडे मराठवाड्याचा मंत्रीच नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता पक्ष या नात्याने शिवसेनेने गांभीर्याने घेतली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना थेट मंत्री जबाबदार असतील, असे सांगून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांची जबाबदारी वाढवली. सेनेने सर्वच्या सर्व मंत्र्यांना मराठवाड्यात कामाला लावले. मात्र, पक्षाने विभागातील एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. पक्षाने मराठवाड्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी येथील आमदारांकडून होत आहे.
सत्तेत येताच भारतीय जनता पक्षाने विधानसभेचे अध्यक्षपद मराठवाड्याला दिले. औरंगाबाद जिल्ह्यातील हरिभाऊ बागडे हे मोठ्या पदावर विराजमान झाले. दुसरीकडे बबनराव लोणीकर (जालना) आणि पंकजा मुंडे (बीड) या दोघांना कॅबिनेट मंत्रिपदे दिली. त्यांच्या बरोबरीने शिवसेनेकडूनही मराठवाड्यातून मंत्रिमंडळात किमान एक-दोघांचा समावेश केला जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु ती पूर्ण होऊ शकली नाही.
पहिल्या शपथविधीनंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे बोलले जाते. त्यात शिवसेनेच्या वाट्याला तीन मंत्रिपदे अपेक्षित आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याला सेनेकडून कॅबिनेट मंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा आहे. शिवसेनेचे अन्य मंत्री बाहेरून येऊन येथील दुष्काळाची काळजी वाहत आहेत. त्यापेक्षा येथेच मंत्रिपद दिले तर ते पक्षासाठी सोयीचे ठरू शकते. १९९५ मध्ये प्रथम सत्तेवर आल्यावर चंद्रकांत खैरे, अर्जुन खोतकर, जयप्रकाश मुंदडा, डी. बी. पाटील, सुरेश नवले यांना मराठवाड्यातून मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. या वेळी किमान एक तरी मंत्री येथून असावा, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.