आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्‍काळी झळा : पाखरांनो, परत फिरा रे..

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पूर्वीपासून माणूस आणि पशू-पक्षी यांचे सहजीवन आपण पाहत आलो आहोत. ज्या घरात चिमण्यांचा किलबिलाट ऐकू येतो, अंगणात साळुंकीसह अन्य पक्षी दाणे टिपायला येतात त्या घरात खरी बरकत असते, असे म्हटले जायचे. किंबहुना पक्ष्यांसाठी खास धान्य, भाताची शिते काढून ठेवली जात. त्यांच्यासाठी आपसूकच पाण्याची व्यवस्थाही होत असे. पण आता ‘गेले ते दिन गेले’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. पूर्वी भरपूर झाडी, वाड्यांचा परिसर, घरांमध्ये वावर यामुळे सावलीच्या आडोशाने आणि भरपूर पाणी व ओलावा असल्याने पक्ष्यांचे जगणे सुसह्य होत असे. आता मात्र हे सगळेच लयाला गेले आहे. झाडी गेली, सिमेंटची जंगले उभी राहिली. त्यात यंदा तर भीषण दुष्काळ आणि पाण्याचा अभाव यामुळे कडक उन्हात पक्षी तग धरू शकत नाहीत. उन्हामुळे शरीराची लाहीलाही होत आहे. त्यावरच काही संस्थांनी उपाययोजना शोधल्या आहेत. काय आहे त्यांचे कार्य, आपण आपल्या परीने त्यात काय करू शकतो, याचा परार्मश घेऊया..

शहरात आहेत पुढील पक्षी
औरंगाबाद शहरात पक्ष्यांच्या एकूण 250 जाती आहेत. यामध्ये 160 स्थानिक पक्षी, तर तब्बल 90 स्थलांतरित पक्षी आहेत. स्थानिकांमध्ये मोठय़ा प्रमाणात आढळणारे पक्षी म्हणजे साळुंकी, घार. बगळ्याचे विविध प्रकार जसे- लिटली ई ग्रेट, मिडल ई ग्रेट, ब्लॅक ईबीस, सापमार गरूड, बहिरी ससाणा, तितर, जांभळी कोंबळी, नदी सुरय, कावळा, चिमणी, पोपट आदींचा यात समावेश आहे, तर स्थलांतरित पक्ष्यांमध्ये फ्लेमिंगो कॉरमोरंट, बार हेडेड गूज, पिन टेल आदींचा समावेश आहे. दक्षिण ध्रुवावर मोठय़ा प्रमाणात बर्फ पडतो. तो या पक्ष्यांना सहन होत नाही. या भागात ऑक्टोबर ते मार्च महिन्यात जमिनीवर बर्फाचे थर साचतात. यामुळे या पक्ष्यांना त्या ठिकाणी अन्न मिळत नाही. त्यामुळे ते स्थलांतर करून आपल्याकडे येऊन राहतात. मार्च महिन्यात आपल्याकडे ऊन वाढायला लागल्यानंतर तिथला बर्फ कमी होतो. त्यानंतर हे पक्षी मायदेशी परततात.


घरट्यांसाठी जागाच नाही
शहरी भागात झाडेच नसल्यामुळे चिमण्यांना घरटी बांधायला जागा राहत नाही. सिमेंटची घरे, तीही अंगण नसलेली. त्यामुळे या घरांमध्ये घरटी टिकत नाहीत. घरांच्या खिडक्यांना व्हेंटिलेटर बसवल्याने व दरवाजे बंद
असल्याने त्यांना घरात प्रवेश मिळत नाही. बाहेर ऊन असल्याने रणरणत्या उन्हात हिंडण्याची वेळ येते. परिणामी त्यांचा तडफडून मृत्यू होतो. हे प्रकार टाळण्यासाठी त्यांना घरटे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सहज उपलब्ध झालेल्या घरट्यामध्ये पक्षी लगेच राहायला जात नाही. पहिले सूक्ष्म निरीक्षण करून सुरक्षित वाटले तरच हे पक्षी तेथे जातात आणि पिलांना जन्म देतात.


पाण्यासाठी वणवण
पूर्वी नदी, ओढे, तळी आणि नाले यामुळे सर्वत्र पाणी सहज उपलब्ध होत असे. या ठिकाणाजवळील परिसरात पक्षी मोठय़ा प्रमाणात घरटे बांधायचे. पिलांना उन्हाचा तडाखा बसू नये म्हणून हे पक्षी दाट झाडीत घरटी बांधून पिलांना जन्म देतात. नदी-नाल्यांवरच्या पाण्यात पंख ओले करून ते पिलांना ओलावा देतात, पण पाण्याअभावी त्यांना प्रचंड उष्म्याचा त्रास सहन करावा लागातो. बर्‍याचदा तर ते उष्णतेमुळे पिलांना जन्मच देत नाहीत. आता तर नद्या कोरड्या पडल्या आहेत. नाल्यातही पाणी नाही. डास आणि इतर रोगराईच्या भीतीमुळे आपण कोठेही पाणी साचू देत नाहीत. वृक्षतोडीमुळे हवामानातील कोरडेपणा व उष्णता वाढली आहे. यामुळेही दिवसेंदिवस पक्ष्यांचेही प्रमाण कमी झाले आहे. त्यांना पिण्यासाठी पाणीच मिळत नाही.


गूळ घातलेले पाणी, ग्लुकोज पाजा
मनुष्याला घाम येत असल्याने त्याच्या शरीरातील तापमान प्रत्येक ऋतूत स्थिर राहते. पण पक्ष्यांना घाम येत नाही. ते विष्ठेच्या माध्यमातून शरीराचे तापमान संतुलित राखतात. ते उडत असल्याने त्यांची पचनसंस्था उत्तम होण्यासाठी पाणीही मुबलक लागते. चांगले पाणी मिळाले तर त्यांची पचनसंस्था व्यवस्थित काम करते, पण पाण्याअभावी ते ग्लानी येऊन पडतात. हे प्रकार टाळण्यासाठी त्यांना गूळ घातलेले किंवा ग्लुकोजचे पाणी पाजायला हवे. तसे केल्यास ते तरतरी येऊन उडून जातात, असे पक्षीतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सरसावल्या पक्षिमित्रांच्या संघटना
उन्हात तडफडणार्‍या पक्ष्यांसाठी पक्षिप्रेमी संघटना सरसावल्या आहेत. यात रोटरी क्लब, निसर्ग मित्रमंडळ, प्रयास, रोहित नेचर क्लब, महाराष्ट्र पब्लिक स्कूल, मुकूल बालक मंदिर, त्रिमूर्ती बालक मंदिर, रोटरी क्लब, पक्ष्यांवर संशोधन करणारे एनव्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशन अँड एज्युकेशन अकॅडमी. याचे सदस्य पक्ष्यांचा जीव वाचवण्यासाठी नागरिकांचे समुपदेशन करण्यासोबतच त्यांच्यासाठी घरटी तयार करणे आणि पाण्याचे भांडे ठेवण्याचे काम करत आहेत.


पक्ष्यांसाठी काय करता येईल?
घराच्या टेरेसवर पाण्याची छोटी, पसरट (मातीची) भांडी ठेवा.
*पक्ष्यांना खाण्यासाठी अन्नधान्य टाकू शकता.
*आसरा मिळावा म्हणून घरटे ठेवा किंवा घरटी तयार करण्यासाठीचे साहित्य ठेवा.
*घराच्या परिसरात झाडी लावा. लहान बागही फुलवा.
*परदेशी पक्षी येणार्‍या ठिकाणी शेततळ्यासारखी छोटी पाणथळे निर्माण करण्याच्या कामात सहभागी व्हा.
मोफत पाण्याची भांडी व घरे
पक्ष्यांना पाणी प्लास्टिकच्या भांड्यात ठेवू नये. ते गरम होते. त्यामुळे ते मातीच्या भांड्यात ठेवले पाहिजे. यासाठी भांडी व घरटे हवे असल्यास मी देण्यास तयार आहे. त्यासाठी माझ्याशी 9422704251 या क्रमांकावर संपर्क साधावा.
दिलीप यार्दी,ऊपक्षीतज्ज्ञ
घरोघरी भांड्यांचे वाटप
गोगाबाबा टेकडीवर पक्ष्यांना खाण्यासाठी दाणे व पिण्यासाठी पाणी नाही. यावर उपाय म्हणून आम्ही स्वस्त धान्य विकत घेतले. ते टेकडीवर टाकतो. छोटे-छोटे खड्डे करून पक्ष्यांना त्यात पाणी टाकतो. 22 मार्चला जागतिक स्पॅरो डेनिमित्त घरोघरी पाण्याची भांडी वाटणार आहोत.
रवी चौधरी, प्रयास ग्रुप
नागरिकांचे समुपदेशन
आम्ही घरोघरी जाऊन समुपदेशन करतो. टेरेसवर पक्ष्यांसाठी पाणी व धान्य ठेवा. पक्ष्यांना विष्ठेच्या साहाय्याने शरीराचे तापमान नियंत्रित करावे लागते. यामुळे पाणी गरजेचे आहे. त्यामुळे स्थलांतर व मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकेल.
प्राजक्ता तारे ,ऊरोट्रॅक्ट क्लब ऑफ एअरपोर्ट
घरीच झाडावर 6 घरटी
मी माझ्या घरातील झाडावर पक्ष्यांसाठी घरटी ठेवली आहेत. पक्षी या घरट्यांत येतात व राहतात. त्या झाडावरच जुन्या र्शीखंडाचे डबे झाडाला अडकवतो. त्यात नियमित पाणी टाकतो.ऋषिकेश तोडीवाल, विद्यार्थी
मुलांसाठी कार्यशाळा
लहान मुलांना पक्ष्यांची माहिती व्हावी म्हणून आम्ही एप्रिलमधे घरटे बनवण्याकरिता कार्यशाळा घेणार आहोत. यामुळे मुले घरटी बनवून स्वत:च्या अंगणात ठेवून माहिती घेऊ शकतील.
किशोर गठडी, ऊनिसर्ग मित्रमंडळ
मुलांना आनंद मिळतो
खिडकीत येणार्‍या पिलांना पाणी पाजल्यामुळे व धान्य दिल्यामुळे समाधान मिळते. आता मी स्वत: न विसरता त्यांच्या भांड्यात पाणी टाकते.टं1आरती कुलकर्णी,गृहिणी, सिडको