आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाने होरपळले अन् ठेकेदारानेही फसवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दुष्काळामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून कामाच्या शोधात वणवण भटकणार्‍या कुटुंबाला काम मिळाले. मात्र, कामाचे पैसे न देताच ठेकेदार परागंदा झाला. गावी परत जाण्यासाठी जवळ पैसे नाही. पत्नी व दोन लहान मुलांना घेऊन 25 किमी पायी प्रवास करीत ट्रकवाल्याच्या कृपेने औरंगाबादला पोहोचलेल्या पीडित कुटुंबास रेल्वेस्टेशनवरील संजय दत्त मित्रमंडळाने मदतीचा हात देऊन त्यांना जेऊखाऊ घातले आणि रेल्वेचे तिकीट काढून देऊन गावाकडे रवाना केले. या प्रसंगातील आपद्ग्रस्त कुटुंबप्रमुख देवा पाटील याची ही आपबिती त्यांच्याच शब्दांत-

देवा उत्तम पाटील राहणार मोहनीगड (ता. माहूरगड, 32 वर्षे) गावात तिघा भावांच्या वाट्याला आलेली 12 एकर जमीन. पाणी नसल्यामुळे जमिनीवर गवताचे पातेही उगवले नाही. कामाच्या शोधात दोघा भावांनी मुंबईचा रस्ता धरला. परिस्थिती अधिक बिकट झाल्याने मलाही नाइलाजास्तव कामाच्या शोधात भटकंती करावी लागली.

वाशीमला भेटला ठेकेदार : कामासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे असे लक्षात आल्यानंतर वाशीमला गेलो. तेथे मोहन शिंदे नावाचा ठेकेदार भेटला. काम देतो म्हणून त्याने पुणे जिल्ह्यातील नारायणगावला चलण्यास सांगितले. मी पत्नी लता, मुलगी रविना (3) व मुलगा अजय (4) यांना घेऊन नारायणगावला गेलो. सोबत अजून दोन कुटुंबे होती.

विहिरीचे काम केले : तेथे राहायला झोपडी मिळाली. आता दोन महिने तरी बेफिकिरीचे जातील असे वाटत होते. ठेकेदाराने किराणा व इतर खर्चासाठी पाचशे रुपये दिले आणि विहिरीचे काम करण्यास सांगितले. त्यानुसार पंधरा दिवस विहिरीचे काम केले. आंब्याच्या झाडाखाली मुलगी बसलेली होती. तिच्या डोक्यावर आंबा पडल्याने मोठी दुखापत झाली. दवाखान्यात तीनशे रुपये खर्च आला. पंधरा दिवसांनंतर ठेकेदार शिंदे पैसे घेऊन फरार झाल्याचे सांगण्यात आले. पुरुषाला 300, तर महिलेस 200 रुपये रोज दिला जाईल असे सांगण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात हाती काहीच आले नाही.

पायी प्रवास करावा लागला

कामाचे पैसे तर मिळाले नाहीच, परतीला गावी जाण्यासाठी नारायणगाव येथून पिंप्री चिंचवडपासून अलीकडे असलेल्या गावापर्यंत आम्ही पायी आलो. तेथून एका मराठी ट्रकचालकास आमची परिस्थिती सांगितली. त्याला दया आली व त्याने आम्हाला औरंगाबादला सोडले. रस्त्याने जेवणही दिले. औरंगाबाद स्टेशनच्या बोहर झोपलो. तेथे संजय दत्त मित्रमंडळाच्या सदस्यांनी जेवण व रेल्वेने जाण्यासाठी पैसे दिले. आता घरी जाऊन रोजगार हमी योजनेच्या कामावर जाईल. इकडे तिकडे भटकल्यापेक्षा गड्या आपुला गाव बरा असेच म्हणण्याची वेळ आली.


काही कमाई समाजकार्यासाठी
अत्यंत दु:खी अवस्थेत बसलेल्या कुटुंबाची चौकशी केल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर ओढवलेला दुर्धर प्रसंग सांगितला. दुष्काळासाठी गाव सोडून फिरणार्‍या कुटुंबास जेवण दिले व रेल्वेने जाण्याचा खर्चही दिला. आम्ही बाउन्सरचे काम करतो. काही रक्कम समाजकार्यावर खर्च करतो. सुभाष गायकवाड व अक्षय सलामे.