आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थिती बिकटच, थोडा धीर धरा! केंद्रीय पथकाने पहिल्यांदाच दाखवली शेतकऱ्यांना आपुलकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुष्काळाची खाई : पथकातील अधिकाऱ्यांना पाहणी करताना मराठवाड्यातील दुष्काळाचे गांभीर्य उमजले. - Divya Marathi
दुष्काळाची खाई : पथकातील अधिकाऱ्यांना पाहणी करताना मराठवाड्यातील दुष्काळाचे गांभीर्य उमजले.
औरंगाबाद /बीड/ जालना- मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने या वेळी प्रथमच शेतकऱ्यांशी आस्थेवाईकपणे चर्चा केली. येथील स्थिती बिकटच आहे; पण थोडा धीर धरा, आम्ही सकारात्मक आहोत, असा आश्वासक शब्दही या पथकाने शेतकऱ्यांना दिला. गेल्या तीन वर्षांत केंद्राची पाच पथके मराठवाड्यासह राज्यात येऊन गेली. परंतु त्यांचा हा दौरा केवळ सोपस्कार असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले. मात्र शुक्रवारी आलेल्या पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी गांभीर्याने चर्चा केली. पिकांची परिस्थिती जाणून घेण्याबरोबरच काय केले पाहिजे, कसे केले पाहिजे, याचाही सल्ला दिला. प्रत्यक्ष पाहणीसाठी या वेळी प्रथमच या पथकाने मोठी पायपीट केली.
गेल्या चार वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकरी कायम दुष्काळाचा सामना करत आहे. केंद्र व राज्य शासनाकडून वेळोवेळी मदतीचे पॅकेज जाहीर केले जाते, ते देण्याआधी त्यांचे अधिकारी येथे दाखल होतात. यातील बहुतांश अधिकाऱ्यांना मराठीची जाण नसल्यामुळे ते दुभाष्यांमार्फत शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात, असे आतापर्यंतचे चित्र होते. केवळ सोपस्कार म्हणून पथकाने दौरे केले होते. त्यामुळे या वेळी आणखी एक दौरा कशासाठी, असाही सवाल उपस्थित केला जात होता. हे अधिकारी धावत-धावत पुढे जाणार असे बोलले जात होते. शुक्रवारी सकाळी तीन पथकांनी औरंगाबाद सोडले. एक पथक बीडकडे, दुसरे जालन्याकडे तर तिसरे नगरकडे रवाना झाले. बीडकडे रवाना झालेल्या पथकाने औरंगाबाद जिल्ह्यातील आडूळ शिवारातील एकनाथ भांबले या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहणी केली. त्यांनी सहा एकरात तूर आणि सरकी लावली होती. अवघ्या एक फुटापर्यंतच पिकाची वाढ झालेली. पथकाने पेरणीपासूनची प्रगती तसेच पावसाचे प्रमाण जाणून घेतले.

पाचोड येथे दोन ठिकाणी या पथकाने वाळलेल्या मोसंबी बागांची पाहणी केली. त्याची कारणेही जाणून घेतली. विहिरीला पाणी नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. तेव्हा नोव्हेंबर महिन्यात विहिरींचे पाणी कसे काय आटू शकते, असा प्रश्न पथकातील काही अधिकाऱ्यांना पडला. तेव्हा हे अधिकारी विहिरीची पाहणी करण्यासाठी दोन किलोमीटर पायपीट करत गेले. प्रत्यक्ष विहिरीची पाहणी केल्यानंतर यापुढे जलसंवर्धन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यापूर्वीच्या पथकाने मोटारीतून उतरल्यानंतर रस्त्याच्या कडेलगतच्याच पिकांची पाहणी केली होती. परंतु यावेळी पथकाने ठरवून शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पाहणी केली. त्याचबरोबर आम्ही येथील बिकट परिस्थिती बघितली, शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे, आम्ही याबाबत सकारात्मक आहोत. लवकरात लवकर कशी मदत मिळेल, याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासनही त्यांनी थेट शेतकऱ्यांशीच बोलताना दिले.
मराठीतून साधला शेतकऱ्यांशी संवाद
केंद्रीय पथकातील आर. पी. सिंग हे अधिकारी शेतकऱ्यांशी चक्क मराठीतून संवाद साधत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनाही संवाद साधणे सोपे गेले. लाल दिव्यातून आलेले अधिकारी मराठीतून संवाद साधताहेत, काय केले पाहिजे, याचा सल्लाही देताहेत हे शेतकऱ्यांना चकित करणारे होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या अडचणी, समस्या केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांच्या कानावर घालणे सहज शक्य झाले. आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती मदत मिळण्याची.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अशी उडाली अधिकाऱ्यांची भंभेरी... दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची अवस्था जाणून घेण इतक असत कठीण...