आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळी पथक झर्रकन आले अन् भुर्रकन गेले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पक्ष्यांचा थवा एखाद्या ठिकाणी येऊन बसावा अन् भुर्रकन उडून जावा, अशाच पद्धतीने मोटारींच्या ताफ्यात दिल्लीचे दुष्काळ पाहणी पथक आले अन् शेतकरी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधीच पुढे निघून गेले. प्रत्यक्ष पाहणीसाठी हे पथक आले होते; परंतु त्यांचा बहुतांश वेळ गेला तो प्रवासातच. कारकीन येथील एका शेतात मोजून एकच मिनिट, दुसऱ्या ठिकाणी ५ मिनिटे, तिसऱ्या ठिकाणी पुन्हा एक मिनिट अशी धावती भेट देत हे पथक पुढे अंबड मार्गे बीडकडे रवाना झाले.त्यांच्या या झपाट्यावरून त्यांचा हा दौरा केवळ उपचार तर नाही ना, अशा शंका शेतकऱ्यांनी घेतल्या आहेत.
सकाळी ८.३० वाजता हे पथक विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी निधी पांडे व कृषी अधिकाऱ्यांसह औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघाले. ९.३० वाजता त्यांनी कारकीनच्या गणेश मुळेंच्या शेतातील सोयाबीन पाहिले. गेल्या दोन महिन्यांत पीक फुटभरच वाढले आहे. त्यानंतर अन्य दोन शेतकऱ्यांच्या मका व उद्ध्वस्त कपाशीचीही पाहणी केली.

पथकातील ८ ते १० गाड्यांच्या ताफ्याकडे दुतर्फा शेतकरी बघत होते. यापूर्वी दोन वेळा केंद्रीय पथक आले होते. तेव्हाच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या भेटींशिवाय मोटारी थांबवून अचानकपणे शेतकऱ्यांची विचारपूस केली होती; परंतु या पथकाने तसे केले नाही. कारकीनच्या शेख शफिक यांची विहीर पाहण्याची इच्छा पथकाने व्यक्त केली तेव्हा स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी पुढची विहीर पाहू असे सांगत त्यांना थांबवलेे. थोडक्यात, प्रशासनाने जेवढे ठरवले होते, तेवढ्याच ठिकाणांना या पथकाने भेटी दिल्या व दौरा गुंडाळला.

३ तास २० मिनिटांचा दौरा
सकाळी ८.३० वाजता सुरू झालेला दौरा ११.५० मिनिटांनी पाचोड येथे संपला. या काळात पथकाने ११५ किलोमीटरचा प्रवास केला. रहाटगाव येथील शेतकऱ्यांनी पथकाचा रस्ता अडवून कर्जमुक्तीची मागणी केली. या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पथकाने १५ मिनिटे दिली हे विशेष.

शेतकऱ्यांचा हिरमोड
पथक आल्याचे कळल्यावर अनेक शेतकरी त्यांच्या भेटीसाठी धडपडत होते. परंतु ते पोहोचण्यापूर्वीच पथक ताफा पुढे जात होते. प्रशासनाने मोजक्याच शेतकऱ्यांना या दौऱ्याची कल्पना दिली होती. पथक पाहणीसाठी आले की फोटो काढण्यासाठी, असा सवाल सदाशिव एरंडे या शेतकऱ्याने केला.
८७० गावे व ४५४ वाड्यांना अवर्षणाचा फटका
०७% जलसाठा ८१४ सिंचन प्रकल्पांत शिल्लक
११ लाख हेक्टर शेती पावसाअभावी पडली पडीक
अापत्कालीन नियोजनाचे आदेश
मुंबई - मराठवाड्यात पिण्याचे पाणी व चाऱ्याची गंभीर स्थिती असून बीड, उस्मानाबाद व लातूरच्या बिकट िस्थतीबाबत स्वतंत्र आपत्कालीन नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिल्या. सविस्तर.

पाहणी दौरा- तीन तासांत ११५ किमीचा प्रवास...
५ ठिकाणी भेटी
एका शेतात मोजून एक मिनिटे, दुसऱ्या ५ मिनिट तर तिसऱ्या शेतात पुन्हा एका मिनिटात आटोपली पाहणी.

दुष्काळ पाहणी पथकाकडे व्यथा मांडण्यासाठी शेतकऱ्यांच्या
दुतर्फा रांगा, पण ना भेट ना चर्चा!

जिल्हा प्रशासनाने ठरवलेली ठिकाणे आणि शेतातच मारला पाहणी पथकाने फेरफटका

पिकांसारखेच करपलेले चेहरे व अस्वस्थ स्पंदने...
जूनच्या प्रारंभीच जोरदार पाऊस झाल्याने प्रफुल्लित झालेल्या शेतकऱ्यांचे चेहरे पावसाच्या दोन महिन्यांच्या दडीने आता त्यांच्याच शेतातील पिकांप्रमाणे कोमेजून गेले आहेत. मनात अस्वस्थता असल्याचेही त्यांच्या भकास चेहऱ्यावरून वाचता येते. केंद्रीय पथक पाहणीसाठी आले असले तरी पदरी काही पडणार नाही, कारण मागील तीन वर्षांपासून काय मिळाले, याची जाणीव असल्यामुळे या पथकाकडून त्यांना फारशी अपेक्षा नसल्याचेही दिसून आले. खरीप तर हातचे गेलेच आहे, परंतु आता जोरदार पाऊस व्हावा म्हणजे रब्बीची तयारी करता येईल; अन्यथा काही खरे नाही, असे निराश शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले.
दुष्काळाच्या पाहणीसाठी मंगळवारपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेल्या पथकासोबत औरंगाबाद जिल्ह्यातील गावांना सदर प्रतिनिधीने भेट दिली असता त्यांची अस्वस्थता टोकाची असल्याचे दिसून येते. आज ना उद्या पाऊस होईलच, या आशेवर ही मंडळी अजूनही तगून

आहे. पीक कोमेजल्याने काहींनी त्यावर नांगर फिरवला, तर काही जण अजूनही प्रतीक्षेत आहेत. दुबार पेरणीची कुवत नसल्याचे शेतकरी स्पष्टपणे सांगतात. आजपासून रोज पाऊस पडला तरी आम्ही दुबार पेरणी करू शकणार नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. पदरमोड करून पेरणी केली होती. पाऊस पाणी चांगला असल्याने मोकळ्या हाताने खत दिले, फवारणी केली. आता पदरात काहीही नाही. त्यामुळे पाऊस झाला तरी पुन्हा पेरणी करणे शक्यच नसल्याचे शेतकऱ्यांनी पथकातील अधिकाऱ्यांनाही स्पष्टपणे सांगितले.

हा धक्का न पेलवणारा
गेल्या चार वर्षांपासून येथील शेतकरी कायम दुष्काळाला सामोरे जातोय. गतवर्षी रब्बी जोरात आली होती. मात्र ऐनवेळी गारपीट झाल्याने ती रब्बीही हातची गेली. एकूणच गेल्या चार वर्षांपासून येथील शेतकरी अस्मानाशी दोन हात करतोय. आता मात्र शक्ती क्षीण झाल्याचे बुजुर्ग शेतकरी काकासाहेब खोतकर यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या चार वर्षांपासून आमदानी कशाला म्हणतात तेच माहिती नाही. जे काही उत्पन्न हाती येते, त्यातून पुढील पेरणीची तजवीज करावी लागले. तीन वर्षे तेच केले. आतापर्यंत कसेबसे तगलो होतो. यंदा चांगला पाऊस झाल्याने आशा वाढल्या होत्या. यंदा आमदानी हाती मिळेल, असे अपेक्षित होते; परंतु पावसाने दडी मारून तेही काढून घेतले. त्यामुळे आता रब्बीसाठी उसनवारी करावी लागेल, पण खरीप पेरणे शक्य होणार नाही. कारण आज घडीला दीड दमडीही जवळ नाही.

मंत्र्यांच्या घोषणा फक्त कागदावरच
कर्ज वसुली करण्यात येऊ नये, नवे कर्ज तातडीने द्यावे, ही कृषिमंत्री एकनाथ खडसे यांची घोषणा फक्त कागदावरच किंवा वृत्तपत्रांतील बातम्यापुरतीच मर्यादित असल्याचेही समोर आले. त्यामुळेही शेतकरी नाराज आहे. कृषी कर्ज देण्यात येतात, पण मागील बाकी त्यातून वळती करण्यात येत आहे. त्यामुळे ५० हजार ते १ लाखापर्यंतचे कर्ज घेतले तरी हाती १० ते २० हजार रुपयेच तेवढे मिळत आहेत. आम्ही कर्ज देतोय, असे बँका सांगत असल्या तरी मागील कर्जाची वसुली करून ते मोकळे होत आहेत. त्यामुळे कागदपत्रे घेऊन बँकांचे उंबरे झिजवूनही हाती लाखाला २० हजारही मिळत नसल्याचे कारकीन येथील रमेश मुळे यांनी सांगितले. त्यामुळे मंत्र्यांच्या घोषणा अन् प्रत्यक्ष चित्र यात तफावत आहे. परिणामी सरकारविषयी शेतकऱ्यांत नाराजी तर दिसतेच, त्याचबरोबर आता अपेक्षा ठेवून चालणार नाही, असेही ही मंडळी बोलताना दिसली.