आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद शहरात ‘दुष्काळी’ यंत्रणा कोलमडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पैठण गेट येथे मलनिस्सारण वाहिनीचे काम करताना दूरसंचार विभागाची ऑप्टिकल फायबर केबल यंत्रणा उद्ध्वस्त झाली. त्यामुळे दुष्काळाची माहिती देण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये कार्यान्वित केलेली इंटरनेट व व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यंत्रणा पूर्णपणे कोलमडली. शहागंज, सिटी चौक व पोस्ट ऑफिस कार्यालय परिसरातील बीएसएनलच्या 30 हजारांपेक्षा जास्त मोबाइलधारकांचा संपर्क तुटला. रात्री 10 वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते.

महापालिका क्रांती चौक विभागाच्या गुरुनानक कन्स्ट्रक्शन एजन्सीने मलनिस्सारण वाहिनीचे काम सकाळी 9.30 वाजता सुरू केले. त्या वेळी ऑप्टिकल फायबर केबल तुटली. दूरसंचार विभागाला याची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी व कर्मचारी येथे हजर झाले व दुरुस्तीसाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.

शासकीय व्यवस्थेला फटका : केबलची जोडणी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व केंद्र सरकारच्या इतर कार्यालयांना दिलेली आहे. इंटरनेट व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी दिलेल्या जोडण्याच तुटल्याने दुष्काळासंबंधी नियमित मुंबई मंत्रालयात दिली जाणारी माहिती रविवारी दिली गेली नाही.

मंत्रालयातून विचारणा : राज्याच्या संपूर्ण भागातून दुष्काळासंबंधी नियमित माहिती मंत्रालय मुंबई येथे कळवली जाते. औरंगाबादहून संपूर्ण मराठवाडा विभागाची माहिती विभागीय आयुक्तालयातून पाठविली जाते. तालुकानिहाय दुष्काळाची स्थिती यासंबंधी व्हिडिओकॉन्फरन्सिंग माहिती दिली जाते. रविवारी माहिती न आल्याने जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तालयातून इंटरनेट व व्हिसी यंत्रणा बंद असल्याचे मंत्रालयात सांगण्यात आले. मंत्रालयातून अधिकार्‍यांनी दूरसंचार विभागाशी संपर्क साधून यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या.

मोबाइलधारकांना त्रास:
यंत्रणा कोलमडल्यानंतर शहागंज, सिटी चौक व मुख्य डाक विभागाच्या परिसरातील टॉवरशी संबंधित मोबाइल यंत्रणा बंद पडली होती. या परिसरातील 30 हजारांवर मोबाइलधारकांना याचा फटका बसला. दरम्यान, मनपाचे अधिकारी व गुरूनानक कंपनीचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. क्रांती चौकचे प्रभाग अधिकारी एस. आर. जरारे यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही. दूरसंचार विभागाच्या अधिकार्‍यांचेही कॉल स्वीकारले जात नसल्याचे सांगण्यात आले.

मनपाच्या यंत्रणेमुळे ऑप्टिकल फायबर केबल उद्ध्वस्त झाली. याची दुरुस्ती जागेवर करता येत नसून, त्यासाठी स्वतंत्र मशीनची आवश्यकता असते. मंत्रालयातून कामासंबंधी विचारणा झाली. यंत्रणा रात्री 10 वाजेपर्यंत दुरुस्त झाली नाही. यामुळे 30 हजारांवर नागरिकांना झळ सोसावी लागली.
-मनोज जैस्वाल, उपविभागीय अभियंता, बीएसएनएल.