आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - लाडसावंगीच्या शेख हनीफ यांनी मुलीच्या लग्नासाठी दोन लाख रुपयांची बैलजोडी एक लाखाला विक्रीला काढली. दानापूरच्या सतीश देशमुखांनी चारापाणी नाही म्हणून दोन्ही बैलजोड्या अर्ध्या किमतीत विकायला आणल्या. तर विटेकरवाडीच्या शामराव पवारांनी विहिरीचे पैसे देण्यासाठी गाभण गाय बाजारात आणली. पडेल त्या भावात गुरे विकायची तयारी असूनही ग्राहक फिरकेना! अखेर वाट पाहून थकलेल्या या तिन्ही शेतक-यांनी गुरांसह घराची वाट धरली.
फुलंब्री तालुक्याच्या वडोदबाजारातील हे विदारक दृश्य सोमवारी दिसले. गुरांची विक्री न झाल्याने कोमेजलेल्या चेह-यांनी घराची वाट धरणा-या शेतक-यांच्या भावना ‘दिव्य मराठी’ने जाणून घेतल्या तेव्हा दुष्काळाच्या चटक्यांची दाहकता अधिकच तीव्र असल्याचे जाणवले.
मुलीचे लग्न असल्याने शेख हनीफ गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांची खिल्ला-या बैलांची देखणी जोडी बाजारात विकायला आणत आहेत. मागील दोन सोमवारी त्यांनी बैलजोडीची किंमत दोन लाख रुपये ठेवली होती.
परंतु ग्राहक मिळाला नाही. आज त्यांनी किंमत निम्म्याने कमी केली आणि एक लाखात जोडी विकायला काढली. तरीही ग्राहक मिळेना! अखेर दुपारी पावणेतीन वाजता बैलजोडी घेऊन ते लाडसावंगीला परतले. ‘प्रत्येक खेपेला बैलजोडीची ने-आण करण्यासाठी मला एक हजार रुपये खर्च येतो. हंगामात दोन लाख रुपये कुणीही दिले असते. आता वेळच तशी आली, करणार काय?’ हताश शेख सांगत होते.
‘प्रत्येकी साठ हजारांच्या दोन जोड्या पडेल भावात विकायला काढल्या आहेत. आता बाजार सुटत आहे. दिवसभर उन्हात वाट पाहिली. अर्ध्या किमतीतही बैल घ्यायला कोणी तयार नाही.’ हे सांगताना दानापूरच्या सतीश देशमुख यांचा चेहरा उतरला होता. दहा एकर जमिनीचे मालक असलेल्या देशमुख यांच्याकडे बैलांसाठी चारापाणी नाही. दानापूरच्या जलाशयात ग्लासभरसुद्धा पाणी नाही, असे देशमुख सांगतात.
विटेकरवाडीच्या शामराव पवारांची चिंता यापेक्षा वेगळी नाही. शेतात खणलेल्या विहिरीचे 30 हजार रुपये त्यांना द्यायचे आहेत. एवढा पैसा आणायचा कुठून? त्यासाठी त्यांनी 25 हजार रुपयांची गाभण असलेली संकरित गाय अवघ्या 15 हजारांत विकायला काढली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत कुणीही फिरकले नाही. शेवटी गाय घेऊन ते माघारी वळले.
दुष्काळाच्या दाहकतेचे चटके सोसणा-या शेतक-यांची ही तीन प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. आजच्या बाजारात आणलेल्या सुमारे चार हजार गुरांपैकी 70 टक्के गुरे ही दुष्काळी स्थितीमुळे विकायला मांडली होती. दर बाजारात साधारणत: एक हजार गुरे असतात. आज प्रथमच चार हजारांवर गुरे आणली आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.