आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drought Work Stop After Rain Start In Aurangabad

पाऊस पडताच दुष्काळी कामे बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पावसाने जोरदार हजेरी लावल्याने गावखेड्यांतील मजूर शेतीच्या कामाला लागले आहेत. मजूरच मिळेनासे झाल्याने दुष्काळाच्या काळात हाती घेतलेली कामे बंद करावीत, अशी शिफारस 22 ग्रामपंचायतींनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे जवळपास दोन कोटी रुपयांची कामे थांबवावी लागणार आहेत. जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकार्‍यांकडे तसे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. मजूरच उपलब्ध नसल्यामुळे ही कामे आपोआपच बंद होत आहेत. पावसाळ्यानंतर ही कामे पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

रोजगार हमीवर मिळणारी मजुरी नि शेतकर्‍यांकडून दिली जाणारी मजुरी यात मोठी तफावत असल्याने शासकीय कामे बंद करण्याची वेळ आली आहे. शेतकर्‍यांची कामे संपेपर्यंत रोजगार हमीवरील कामांना मजूर मिळणार नाहीत. त्यामुळे कामे बंद केल्याशिवाय प्रशासनासमोर पर्याय नाही.

दुष्काळाच्या तीव्रतेबरोबरच मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी गेल्या जानेवारीपासून जिल्ह्यात 18 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली होती. यात साखळी बंधारे बांधणे, जलसंवर्धन, सिमेंट बंधारे, रस्ते, पाणीपुरवठा योजना आदी कामांचा समावेश होता. जिल्ह्यातील मजुरांची संख्या दहा हजारांच्या पुढे गेली होती. फुलंब्री तालुक्यात सर्वाधिक मजूर कामावर होते. रोजगार हमीतून ही कामे करण्यात येत होती. जून सुरू होण्याबरोबरच पावसाचे जोरदार आगमन झाले. मात्र शेतकर्‍यांनी लगेचच पेरणीला सुरुवात केली नव्हती. मात्र पावसाचे सातत्य दिसून आल्यानंतर पेरणीचे काम सुरू झाले. आजघडीला 60 टक्के पेरण्या पूर्ण होत आहेत. रोजगार हमीच्या कामावर 162 रुपये रोज मिळतो. मात्र शेतकर्‍यांकडून 200 ते 250 रुपये इतका रोज देण्यात येत असल्याने मजुरांनी आपला मोर्चा शेतीच्या कामाकडे वळवला आहे. परिणामी शासकीय कामे आपोआपच बंद होत आहेत.