आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गटशेतीमुळे शेतकरी जीवनात बदलास मदत: मुख्यमंत्री; ‘ड्राय पोर्ट’मुळे होणार निर्यातीत वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गटशेतीमुळे शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे विविध प्रकारचे पीक घेता येते. तंत्रज्ञानासह  यांत्रिकीचा वापर करता येत असल्याने उत्पादनात आणि पर्यायाने उत्पन्नात वाढ होते. परिणामी गटशेती शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  

देळेगव्हाण येथे ॲग्रो इंडिया गटशेती संघ पुरस्कृत इंडिको फॉर्मर प्रोड्युसर कंपनी आयोजित १४६ व्या द्वादश मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, नारायण कुचे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवानराव कापसे, उपविभागीय अभियंता ल.सि.(जलसंधारण) उपविभाग भोकरदनचे आर.के.जाधव, कार्यकारी अभियंता ल.सि.(जलसंधारण) जालना विभागाचे एस.डी.डोणगावकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे आदी उपस्थित होते.  
  
 मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, शेतीची उत्पादकता कमी होत आहे कारण शेतीचे लहान-लहान तुकडे होत गेल्याने शेतीमधील गुंतवणूक कमी झाली. यांत्रिकीचा वापर करणे अवघड झाले. परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला. यावर गटशेतीला पर्याय नसल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, देळेगव्हाण येथील गटशेती पाहून मनस्वी आनंद झाला. शासनाने तयार केलेल्या गटशेतीच्या मॉडेलमध्ये देळेगव्हाणचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. गटशेती धोरणांतर्गत २०० कोटींंचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.   

जलयुक्त शिवार योजनेविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, या योजनेअंतर्गत राज्यात अनेक कामे झाली असून ११ हजार गावांना लागणारे पाण्याचे टँकर कायमस्वरूपी बंद झाले. ज्या ठिकाणी केवळ खरिपाचे पीक घेतले जात होते त्या ठिकाणी शेतकरी आता रब्बीचेही पीक घेत असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांचा माल जेएनपीटी बंदरापर्यंत  कमी वेळेत पोहोचवता येणार आहे. या महामार्गामध्ये कोल्डचेन उभारण्यात येणार असल्यामुळे नाशवंत फळांसाठी याचा फायदा होणार आहे. जालना जिल्ह्यात होणाऱ्या ‘ड्राय पोर्ट’मुळे निर्यातीत वाढ होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.   

या प्रसंगी पालकमंत्री बबनराव लोणीकर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवानराव कापसे यांनी आपले विचार मांडले.   या कार्यक्रमापूर्वी राज्य शासनाच्या नदी पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथील जीवनरेखा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचे जलपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजूर ते चिखली या राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन, गटशेती शिवार पाहणी तसेच जलपूजनाचा कार्यक्रम पार पडला. 

कर्जमाफीचा लाभ गरजू शेतकऱ्यांनाच होणार 
कर्जमाफीविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. १८  ऑक्टोबर २०१७ पासून कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. या कर्जमाफीचा फायदा राज्यातील गरजू शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच १८ तारखेपासून कापूस खरेदी सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी भावात व्यापाऱ्यांना कापूस विक्री करू नये. शासनाच्या केंद्रावर हमी भावापेक्षा निश्चितच  जास्त भाव शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.  
बातम्या आणखी आहेत...