आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डीटीएडची दुकानदारी बंद! औरंगाबाद विभागातून 8 हजार जागांसाठी केवळ 1,749 अर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डीटीएड (डिप्लोमा इन टीचर्स एज्युकेशन) या अभ्यासक्रमाकडे या वर्षीही विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. नोकरीच मिळत नसल्याने कशासाठी डीटीएड करायचे? अशी विद्यार्थ्यांची मानसिकता झाली आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी दुकानदारीसाठी सुरू केलेली डीटीएड महाविद्यालये बंद होण्याची वेळ आली आहे. डीटीएड अर्ज प्रक्रियेत औरंगाबाद विभागाच्या 8 हजार जागांसाठी केवळ 1 हजार 749 अर्ज आले आहेत. त्यामुळे डीटीएडची दुकानदारी जवळपास बंद होण्यात जमा आहे.
दहा वर्षांपूर्वी डीटीएड महाविद्यालयाचे पीकच आले होते. डीटीएड प्रवेशासाठी मोठे प्रवेश शुल्कही आकारले जात होते. मात्र, डीटीएड केलेल्या उमेदवारांना नोकरीच मिळत नसल्याने तसेच नोकरीसाठी संस्थाचालकांचे खिसे भरावे लागत असल्याने विद्यार्थ्यांनी डीटीएडकडे पाठ फिरवली. आता तर शिक्षकच व्हायचे नाही, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. राज्यभरात शासकीय आणि खासगी शिक्षण संस्थांमध्ये 2 जूनपासून डीटीएड प्रथम वर्ष अर्ज प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. 16 जून ही अर्ज विक्रीची शेवटची तारीख होती, तर 17 जून ही अर्ज स्वीकृतीची अंतिम तारीख होती. या तारखेपर्यंत जवळपास 2200 अर्ज विक्री झाले, परंतु प्रत्यक्ष 1 हजार 749 विद्यार्थ्यांनीच अर्ज जमा केले आहेत. राज्यातून केवळ 14 हजार 600 अर्जांची स्वीकृती झाली आहे. काही वर्षांपूर्वी भरगच्च गर्दीत अर्जासाठी पालकांसह उभे राहणारे विद्यार्थी मात्र यंदा दिसलेच नाहीत. शिवाय मागील वर्षी अर्ज स्वीकृती व विक्रीसाठी वेळ वाढवून देऊनही हवा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे यंदा अर्ज विक्री कमी झाली असतानाही अर्ज स्वीकृती अथवा विक्रीस मुदतवाढ देण्यात आली नाही.

शिक्षणाच्या बाजारीकरणाचा परिणाम : शिक्षण संस्थांमध्ये नोकरीसाठी मोठ्या प्रमाणात देणगी द्यावी लागत असल्याने विद्यार्थ्यांचा डीटीएडकडील ओढा कमी झाला आहे. त्यामुळे डीटीएड कॉलेज बंद होऊन खासगी संस्थांची दुकानदारीही आता बंद होणार आहे. कारण विभागातील जवळपास 50 कॉलेजेस बंद करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला असून काही महाविद्यालयांनी तर स्वत:च कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नोकरी नसल्याचा परिणाम
शिक्षण घेतल्यावरही नोकरी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता आहे. त्यामुळेच एकेकाळी मोठी मागणी असलेल्या डीटीएड अभ्यासक्रमाला विद्यार्थी मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
एल. एल. शिंदे, उपसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे
रोजंदारी परवडली


शिक्षणासाठी पैसा खर्च करूनही नोकरी मिळत नाही. नोकरीसाठी पैसे भरावे लागतात. आता पुन्हा टीईटीचे सोंग आले आहे. 2009 पूर्वी झालेल्या सीईटीतील जवळपास तीन ते साडेतीन हजार उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही. नोकरीच मिळत नसेल तर डीटीएड करून काय उपयोग? यापेक्षा रोजंदारी परवडली.
संतोष मगर, विद्यार्थी