आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डोंगरकाप्यांचा देवगिरीवर ‘हल्ला’; मुरूम माफियांची खुलेआम चोरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'शहराची झपाट्याने वाढ होत असल्याने बांधकामासाठी परिसरातील डोंगर बोडखेच नव्हे, तर भुईसपाट करण्यापर्यंत डोंगरकाप्यांची मजल गेली आहे. हे कमी म्हणून की काय, आता या मुरूम माफियांनी थेट ऐतिहासिक वारसा असलेल्या देवगिरी किल्ल्यावरच हल्ला चढवला आहे. दौलताबाद येथील देवगिरी किल्ला गेल्या 1100 वर्षांपेक्षाही जास्त काळापासून ज्यावर कणखरपणे उभा आहे, तो परिसरच पोखरण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. डीबी स्टारच्या छापा मोहिमेत हा प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे पुरातत्त्व विभागाने जिल्हा प्रशासनाला पत्र देऊन हात झटकले आहेत, तर जिल्हा प्रशासनाला या गंभीर प्रकाराचा पत्ताच नाही.'

राष्ट्रीय संपत्ती म्हणून पुरातत्त्व विभागाकडे देवगिरी किल्ल्याची नोंद आहे. त्यामुळे येथे वर्षभर देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी असते. मात्र, डोंगरकाप्यांनी या किल्ल्याचा आधारच कापण्याचा सपाटा लावला आहे. किल्ल्याच्या पश्चिम व उत्तर दिशेचा परिसर खणून मुरुमाची मोठय़ा प्रमाणात चोरी होत आहे. एवढेच नाही, तर किल्ल्याच्या मागील बाजूस असलेल्या रंगमहालाचा पायासुद्धा चहुबाजूंनी पोखरला जात आहे. त्यामुळे ऐतिहासिक वास्तूच्या परिसरावरसुद्धा मुरूम माफियांची नजर पडल्याची धक्कादायक स्थिती आहे.

येथे होत आहे खोदकाम

किल्ल्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडून मागच्या बाजूस पश्चिम दिशेकडे चिंचोळी वाट लागते. दोन किलोमीटर अंतर कापून गेल्यावर मोठी कमान येते. ती ओलांडून पुढे किल्ल्याचा पार्श्वभाग दिसायला लागतो. तेथून जवळच एका टेकडीवर रंगमहाल आहे. किल्ला आणि रंगमहालाची टेकडी एका मोठय़ा खडकावर आहेत. किल्ला याच पर्वतावर आहे व त्याचा किल्ल्याभोवतीचा परिसरच तासला जात आहे.

डोंगरकाप्यांनी घेतला फायदा
किल्ल्याच्या समोरच्या भागात सुरक्षा रक्षक आहेत. मात्र, किल्ल्याच्या मागच्या बाजूस कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसल्याचा फायदा डोंगरकापे घेत आहेत. हे लोक किल्ल्याच्या पायावरच घाव घालून मुरूम चोरत आहेत. आतापर्यंत 100 ते 150 मीटर लांब एवढा परिसर कापला आहे. हे असेच चालत राहिले तर भविष्यात या किल्ल्याला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नही.

रंगमहालाचा पाया पोखरला
डीबी स्टार चमूने देवगिरी किल्ल्यामागील परिसर पिंजून काढला. पाहणीनंतर रंगमहालाचा पाया आणि मुख्य आधार असलेला भाग खोदला जात असल्याचे दिसून आले. किल्ल्यापासून हे अंतर 300 मीटरपेक्षा जास्त लांब असल्याचे पुरातत्त्व विभागाचे म्हणणे असले तरी डोंगरकापे किल्ल्यापर्यंत पोहोचण्यास वेळ लागणार नाही. दुसरीकडे थोड्या अंतरावरील रंगमहालाचा पायासुद्धा पोखरून काढला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.

काय म्हणतात जबाबदार

कंपाउंड करावे
किल्ल्याच्या मागच्या भागाकडे खरोखरच कुणाचेच लक्ष नाही. भारतीय पुरातत्त्व विभागाने रंगमहाल ते किल्ल्याचा संपूर्ण परसिराला संरक्षणाच्या दृष्टीने कंपाऊंड केले पाहिजे. अन्यथा किल्ल्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
- डॉ. दुलारी कुरेशी, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ

तत्काळ लक्ष घालतो
या प्रकाराची मला काहीही कल्पना नाही. पुरातत्त्व विभागाने पत्र दिले असेल तर त्याचीही चौकशी करतो. मी माझ्या अधिकार्‍यांशी बोलून तत्काळ योग्य ती कारवाई करतो.
-संजीव जैस्वाल, विभागीय आयुक्त

तातडीने पाहणी करतो
मी नुकताच उपविभागीय अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळला आहे. मला या प्रकाराची कल्पनादेखील नाही. तरीही किल्ल्याच्या संपूर्ण परिसराची तत्काळ पाहणी करतो. हा प्रकार गंभीर आहे.
- बाप्पासाहेब थोरात, उपविभागीय अधिकारी

काय म्हणतात तज्ज्ञ

प्रशासनाला कळवले
आम्ही आठ दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिस प्रशासनाला याबाबत लेखी कळवले आहे. आमच्या विभागातील दौलताबादच्या एका कर्मचार्‍याने याबाबत माहिती दिल्यानंतर आम्ही हे पाऊल उचलले.
-ए. एम. व्ही. सुब्रमण्यम, उपअधीक्षक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण

अहवाल मागवतो
या प्रकरणी माझ्याकडे कोणतीच माहिती नाही. औरंगाबाद कार्यालयाकडून सविस्तर अहवाल मागवून कारवाई करण्यास सांगतो.
- डॉ. जितेंद्र नाथ, मुंबई सर्कल प्रमुख, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण

पाठपुरावा सुरू
रंगमहालाबाबत आम्ही जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांशी सातत्याने पत्रव्यवहार करत आहोत. किल्ल्याचा मागचा भाग राज्य किंवा केंद्राच्या पुरातत्त्व विभागाकडे येत नाही. तो भाग जिल्हा प्रशासनाच्याच अखत्यारीत येतो. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष घालायला हवे.
- मुकुंद भोगले, अध्यक्ष, इंटॅक, औरंगाबाद

अतिक्रमण करण्याचा इरादा ?
आतापर्यंत शहरालगतच्या फुलंब्री, चौका, देवळाई भागातील डोंगर कापून काढले जात होते. आता थेट किल्ल्याचाच पायथा पोखरून काढण्याचे उद्योग सुरू आहेत. भविष्यात येथे अतिक्रमण करण्याचे इरादे तर नाहीत ना ? असा प्रश्न निर्माण होतो.