आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेचार लाख एलईडी बल्बमुळे दररोज १२ मेगावॅट विजेची बचत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वीज बचतीच्या माध्यमातून सर्वांना वीज उपलब्ध व्हावी, यासाठी एलईडी बल्बची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकार देशभर राबवत आहे. शहरात डिसेंबर २०१५ रोजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. ११ एप्रिलपर्यंत औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात लाख ५२ हजार एलईडी बल्ब लखलखू लागले. यामुळे दररोज १२ मेगावॅट विजेची बचत होत असून या बचतीतून वाढत्या विजेच्या मागणीचीही पूर्तता होत असल्याचा दावा महावितरण करत आहे.

पर्जन्यमान कमी होत असल्याने जलसाठे कमी होत आहेत. त्यामुळे जलविद्युत निर्मिती करणे बंद पडले आहे. कोळसा खाणी विरळ झाल्याने वीजनिर्मितीचे साधन सामग्रीच दुर्मिळ झाली आहे. दुसरीकडे लोकसंख्या वाढल्याने वीज ग्राहकांच्या संख्येत वाढ होऊन उद्योग, व्यवसाय आणि कृषिपंपांसाठी दिवसेंदिवस विजेची मागणी प्रचंड वाढत आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात शहरात विजेची मागणी ३९ मेगावॅटने वाढली होती. एप्रिलमध्ये त्यात आणखी ११ मेगावॅट वाढ होण्याची शक्यता आहे. १९ हजार नवीन वीज ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली आहे. उच्च दाब वीज ग्राहकांची संख्याही वाढत आहे. या वाढत्या विजेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी एलईडी बल्ब योजना पूरक ठरत असून बचत होत असलेल्या १२ मेगावॅट विजेमुळे संतुलन साधले जात असल्याचे अधीक्षक अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी सांगितले.

वीज बचत करणारे कृषिपंपही देणार : विजेची४० टक्के बचत करणारे कृषिपंपही सरकारतर्फे वाटप करण्यात येणार आहेत. शिवाय सवलतीच्या दरात सोलार संच देण्यात येणार आहेत. औरंगाबादचा सोलार सिटीमध्ये समावेश झाल्याने सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयावर सोलार संच बसवले जाणार आहेत. मागणी, उपलब्ध विजेचा विचार करून सर्वांना वीज पुरवली जाईल. त्याला लोकसहभागाची जोड मिळाली की, उद्दिष्टपूर्ती कठीण नाही.

काय आहे एलईडी बल्ब : लाइट एमिटिंग डायोड (एलईडी) हे एक सेमीकंडक्टर (अर्धवाहक) डिव्हाइस आहे. यातून जेव्हा विजेचे वहन होते तेव्हा यातील अणूंच्या संरचनेमुळे प्रकाश निर्मिती होते. एलईडीचा प्रकाश फारसा गडद नसतो, परंतु बहुतांश एलईडी बल्बमध्ये एकवर्णी अनेक बल्बच्या समूहातून एक बल्ब तयार करून तो अधिक प्रकाशमान बनवता येताे.

सरकारचे पाऊल : एलईडी बल्बचे आयुष्य दहा वर्षे आहे. त्यावर तीन वर्षांची गॅरंटी मिळते. वीज कमी लागत असल्याने वीजबिलात ४० टक्क्यांवर बचत होते. या गुणवत्तेमुळेच केंद्र, राज्य सरकार महावितरणच्या संयुक्त विद्यमाने ३१ मार्च २०१९ पर्यंत एलईडी बल्ब वाटप योजना राबवण्यात येत आहे. ७७ कोटी बल्ब वाटपातून वर्षाला १०० बिलियन युनिट विजेची बचत करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...