आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकरीतील साेड्यामुळे विरघळू शकताे पीआेपीचा गणपती बाप्पा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींचे विसर्जन आता घरच्या घरीच शक्य आहे. एरवी पीओपीची मूर्ती विरघळण्यासाठी महिनोन््महिने लागतात. मात्र, बेकरीमध्ये वापरला जाणारा सोडा बादलीभर पाण्यात मिसळून त्यात मूर्तीचे विसर्जन केले तर ती ४८ तासांत विरघळत असल्याचा प्रयोग पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीजने(एनसीएल) केला आहे. या पद्धतीने विसर्जनासाठी एक फुटाच्या मूर्तीकरिता अवघा २५ रुपये खर्च येतो. मूर्ती विरघळल्यानंतर उरलेले पाणी खत म्हणून परसबागेत वापरता येते, तर बादलीत जमा झालेला चुना खडू तयार करण्यासाठी गृहोद्योगाला भेट म्हणून देता येतो. थोड्याशा परिश्रमाने पर्यावरणाचे संतुलन साधण्यासोबतच गणपतीचे पावित्र्यही जपता येऊ शकते.

पुण्यातील एनसीएलमधील कॅटलिस्ट डिव्हिजनच्या सीनिअर सायंटिस्ट डॉ. शुभांगी उंबरकर गेली तीन वर्षे पीओपीच्या गणेशमूर्तींचे घरातच विसर्जन करण्याबाबत प्रबोधन करत आहेत. त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. डॉ. उंबरकर यांनी एनसीएलच्या लॅबमधून ‘दिव्य मराठी’ला या संपूर्ण प्रक्रियेची शास्त्रीय माहिती दिली.
सर्व घटक उपयोगी : मूर्ती विरघळल्यानंतर अमोनियम सल्फेट हे द्रव्य स्वरूपात शिल्लक राहते. अमोनियम सल्फेट हे सर्वमान्य खत असून सर्वच रासायनिक खतांमध्ये याचा वापर होतो, तर बादलीत सर्वात खालच्या थरावर कॅल्शियम कार्बाेनेट म्हणजेच चुना जमा होतो. याचा खडू बनवण्यासाठी किंवा सिमेंटच्या विटात वापर करता येतो. यास विटांच्या उद्योगात मोठी मागणी असते, असे डॉ. शुभांगी उंबरकर यांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धनासाठी उपयुक्त : पीओपीमूर्तींची समस्या दरवर्षी वाढतच चालली आहे. मात्र, आमच्या प्रयोगामुळे या समस्येवर समाधान मिळू शकते. पुण्यातील नागरिक या पद्धतीने घरातच बाप्पाचे विसर्जन करत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी अत्यंत उपयुक्त शास्त्रशुद्ध पद्धत असल्याचे एनसीएलच्या सिनियर सायंटिस्ट डॉ. शुभांगी उंबरकर यांनी सांगितले.
खर्च फक्त २५ रुपये
घरगुती आणि सार्वजनिक अशा दोन्ही गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी ही पद्धत उपयोगी आहे. यासाठी मूर्तीच्या आकारानुसार पाणी आणि अमोनियम बायकार्बाेनेटचे प्रमाण निश्चित करावे लागते. घरांमध्ये फुटापासून फुटांपर्यंतची मूर्ती बसवली जाते. मूर्ती विरघळण्यासाठी अशी प्रक्रिया आहे.
३. काही वेळातच पाण्यातून बुडबुडे निघताना दिसतात. हे कार्बन डायऑक्साइड आहे. तब्बल ४८ तासांनी मूर्ती पूर्णपणे पाण्यात विरघळून जाईल. उरलेले पाणी बाटलीला स्प्रे बसवून परसबागेतील झाडांवर फवारता येऊ शकते, तर चुना सिमेंटच्या विटा किंवा खडू तयार करणाऱ्या गृहोद्योगास देता येतो. बाजारात एक किलो अमोनियम बायकार्बोनेट म्हणजेच बेकरीचा सोडा १५ ते २० रुपयात किलोभर मिळतो. भारत सरकारच्या राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझरकडे हा साेडा १३ ते १४ रुपये किलोने मिळतो.
१. एका बादलीत मूर्तीच्या वजनाच्या पाचपट पाणी घ्यावे. मूर्ती पूर्णपणे पाण्यात बुडाली आहे याची खात्री करावी.
२. मूर्तीच्या वजनाएवढेच अमोनियम बायकार्बाेनेट पाण्यात मिसळावे. ते ढवळून हळूच मूर्ती यात सोडावी.
बेकरीतील सोडा उपयोगी
प्लास्टर ऑफ पॅरिसला शास्त्रीय भाषेत जिप्सम म्हणतात. रासायनिक भाषेत यास कॅल्शियम सल्फेट (CaSO4) म्हणून अोळखले जाते. ही मूर्ती पाण्यात विरघळत नाही. मात्र, बेकरीतील वापरण्याचा सोडा म्हणजेच अमोनियम बायकार्बाेनेटच्या (NH4 HCO3) मिसळलेल्या पाण्यात टाकली तर त्यात रासायनिक प्रक्रिया होऊन तिचे विघटन सुरू होते. मूर्ती विरघळल्यानंतर पाण्यात कॅल्शियम कार्बाेनेट (CaCO3), अमोनियम सल्फेट (NH4, 2SO4) शिल्लक राहते, तर कार्बन डायऑक्साइड हवेत निघून जातो.
सोडा नेहमी उपलब्ध
बेकरीत वापरला जाणारा सोडा आमच्याकडे सदैव उपलब्ध असतो. १५ ते १८ रुपये किलोप्रमाणे आम्ही तो विकतो. पीओपीच्या गणेश विसर्जनासाठी याचा वापर होणार असेल तर ही चांगली बाब आहे. आम्ही अजून मोठ्या प्रमाणात सोडा मागवून घेऊ. - कांती भाटी, दलपत किराणा स्टोअर
अजून संशोधन व्हावे
एनसीएलचा उपाय आजघडीला तरी प्रभावी आहे. मात्र, कोणत्याही रसायनांची लाइफ सायकल असेसमेंट गरजेचे आहे. अमोनियम सल्फेटचा खत म्हणून वापर शक्य असला तरी रासायनिक खतांचा वापर पर्यावरणासाठी घातक आहे - प्रा. बलभीम चव्हाण, पर्यावरणशास्त्र विभाग
बातम्या आणखी आहेत...