आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्यांमुळे औरंगाबाद विमानतळाला टाळे लागण्याची भीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद विमानतळावरील मोकाट कुत्र्यांची समस्या वरवर लहान वाटत असली तरी यामुळे विमानतळाला टाळे लावण्याची वेळ येऊ शकते. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय अशा प्रकारांना अत्यंत गांभीर्याने घेत असून वर्षभरापूर्वी कुत्र्यांच्या उच्छादामुळे जबलपूर विमानतळ पाच महिन्यांसाठी बंद करण्यात आले हाेते. त्यामुळे औरंगाबाद विमानतळाला टाळे लागणे टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करावी लागणार आहे. मंगळवारी रात्री विमानतळाच्या धावपट्टीवर कुत्रेच धावल्याने एअर इंडियाचे विमान उशिरा उडाले. प्रवाशांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. आज दिवसभर विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी कुत्र्यांची समस्या सोडवण्याच्या चिंतेत होते. दिवसभर बैठका झाल्या. सायंकाळी साडेचार वाजता इमर्जन्सी रनवे अँड ऑपरेशनल एरिया सेफ्टी कमिटीची बैठकही पार पडली. यात विमानपतन निदेशक आलोक वार्ष्णेय, पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, सर्व विमान कंपन्यांचे प्रतिनिधी, सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी, सीआयएसएफचे प्रतिनिधी उपस्थित होते. यात विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन कुत्र्यांच्या समस्येवर चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी आलोक वार्ष्णेय यांनी मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सकाळीच विमानतळावर डॉग व्हॅन आणि पथक पाठवले. दिवसभरात पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढून सात कुत्री पकडली. काही कुत्र्यांनी धावपट्टीवर "लँडिंग' केले होते. त्यांना चतुराईने पकडण्यात आले. पुढील सात दिवस दररोज हे पथक या परिसरात कुत्री पकडणार आहे. गुरुवारपासून सुरक्षा व्यवस्था अाणखी कडक केली जाणार आहे. झाडांची छाटणी केली जाईल. विमानतळाच्या संरक्षक भिंतीच्या १० फूट अंतरावरील अतिक्रमणे काढली जातील. नाल्यांची नियमित सफाई आणि सुलभ शौचालये बांधण्याचे काम हाती घेतले जाईल.

...तर विमानतळाला टाळे : विमानतळावर मंगळवारी घडलेला प्रकार आलोक वार्ष्णेय यांनी अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय अशा प्रकरणी विमानतळांवर कडक कारवाई करते. वर्षभरापूर्वी जबलपूर विमानतळावरही कुत्र्यांची समस्या असल्याने महसंचालनालयाने महिन्यांसाठी या विमानतळाचा परवाना रद्द केला होता. चिकलठाणा विमानतळावर वारंवार अशी परिस्थिती उद््भवल्यास येथेही टाळे लागू शकते, अशी भीती वार्ष्णेय यांनी व्यक्त केली अाहे.

कुत्र्यांची प्रवेशद्वारे : विमानतळाच्याभिंतीलगतच्या नागरी वसाहतीतील लोकांकडून भिंतीलगत कचरा टाकण्यात येतो. काही मांसविक्रेते उरलेले मांस विमानतळ हद्दीत फेकतात. ते खाण्यासाठी कुत्री या हद्दीत प्रवेश करत असल्याचे वार्ष्णेय यांनी सांगितले. काही कुत्र्यांनी संरक्षक भिंतीच्या खालून खड्डे तयार केले आहेत. मनपाचे पथकही कुत्रे कोठून येतात याचा शोध घेत होते. विमानतळाच्या भिंतीखालील खड्डे बुजवण्याचे काम त्वरित सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मनपाचे पशुसंवर्धन पर्यवेक्षक अनंत जाधव यांनी सांगितले.