औरंगाबाद - जिल्ह्यात २०१४ सालाच्या तुलनेत २०१५ मध्ये प्रत्येक गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. विशेष म्हणजे बलात्कार आणि दरोड्याच्या गुन्ह्यांचे प्रमाण मोठे आहे. सततचा दुष्काळ आणि बेरोजगारी यामुळे युवक गुन्ह्यांकडे वळत असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. मात्र, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न कमी पडत असल्याने दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसते.
दररोजच्या गरजा भागवण्यासाठी लागणारा पैसा हा सोप्या पद्धतीने गुन्हेगारीच्या माध्यमातून मिळत असल्याने गुन्हेगारीतदेखील स्पर्धा निर्माण झाली आहे. खुनापासून फसवणुकीपर्यंत सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये झालेली लक्षणीय वाढ आणि पोलिस दलात असलेली कर्मचाऱ्यांची कमतरता पाहता गुन्हेगारांवर आळा घालण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.