आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Drought Five Fish Species Disappeared In Govdavari

आर्त पर्यावरणाचे : दुष्काळामुळे गोदावरीतील माशांच्या सहा जाती अस्तंगत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भीषण दुष्काळामुळे नद्यांची अपरिमित हानी झाली असून गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्यांमधील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. फक्त गोदावरीतच आढळणार्‍या आहेर, कटारना, चोच आणि गोगरा यासह एकूण सहा माशांच्या जाती जवळपास नष्ट झाल्या आहेत. शंख-शिंपल्यांसारखे जैव साखळीतील महत्त्वाचे घटकही नष्ट झाले आहेत. दुसरीकडे, कोरड्याठाक पात्रांत जमिनीखालीदेखील ओलावा शिल्लक नसल्याने बिंदुसरा, कयाधू, पूस या नद्यांमधील जैवविविधता संपल्यात जमा आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पॉल हर्बर्ट डीएनए बारकोडिंग सेंटरचे संदीप राठोड आणि विकास कल्याणकर या विद्यार्थ्यांनी गोदावरी नदी आणि खोर्‍यातील जैवविविधतेवर संशोधन केले असून त्याआधारे आणि केंद्राचे संचालक डॉ. जी. डी. खेडकर यांच्या अभ्यासातून दुष्काळामुळे नद्यांचे काय नुकसान झाले याचे भयावह चित्र समोर आले आहे. 1972 नंतरचा सर्वात भीषण दुष्काळ मराठवाडा यंदा अनुभवत आहे. पिण्याच्या पाण्याची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली असून औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांतील बहुतांश जलसाठे आटले आहेत. जलवाहिनी आणि जीवनवाहिनी असणार्‍या नद्यांमधील जैवविविधता नष्ट होत असून हे अदृश्य संकटही कोसळले आहे. यासंदर्भात डॉ. जी. डी. खेडकर म्हणाले की, दुष्काळामुळे स्थानिक जैवविविधतेचे 10 टक्क्यांहून अधिक तर एकूण जैवविविधतेचे 50 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे.

मासे, शंख, शिंपले, स्पॉंजेस.सर्वच जात्यात..
स्थलांतर करू न शकणारे मासे, झिंगे, पाणकिडे, शंख, शिंपले, प्लवंग, गोड्या पाण्यातील स्पाँजेस, बहुपाद प्राणी हे जीवसाखळीतील घटक दुष्काळामुळे संकटात सापडले आहेत. त्याशिवाय उन्हाळय़ामध्ये (उष्णकाल समाधी) पोटात अन्न साठवून जमिनीखाली काही महिने राहणार्‍या बेडकांना जमिनीतील ओलावा नष्ट झाल्याने मेदपिंडातील(फॅट बॉडीज) अन्न लवकर वापरावे लागले. मात्र, बाहेरच्या उष्ण आणि पाण्याचा लवलेश नसलेल्या भागात त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. डिंभकापासून पूर्ण बेडूक तयार होण्यास दोन वर्षे घेणारी एक जात गोदावरीच्या खोर्‍यात आहे. जमिनीतील ओलावा नष्ट झाल्याने या जातीची एक पिढीच संकटात सापडली आहे.

का तुटते जैव साखळी?
डॉ. खेडकर म्हणाले की, परिसंस्थेत जर हळूहळू बदल होत असतील तर प्राणी त्याच्याशी जुळवून घेतात, पण दुष्काळासारख्या अचानक येणार्‍या बदलाला ते सामोरे जाऊ शकत नाहीत. प्राणी जगण्यासाठी आपली रणनीती ठरवतात. ती त्यांच्या मेंदूत इन्प्लान्ट केलेलीच असते. अचानक आलेल्या संकटांत त्यांची ही स्मृती थांबते. या बदलांना हे प्राणी तयार नसतात. त्यातून त्यांची नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू होते आणि जैव साखळी तुटते.

चौकट..पात्र कोरडे, स्थलांतर थांबले
एरवी उन्हाळ्यात नद्यांचे पात्र पूर्णपणे कोरडेठाक पडत नाही. डबकी, तलाव यासारख्या माध्यमातून पाणी उपलब्ध असे. अशावेळी पाणी कमी होताच जलचर स्थलांतर करून सुरक्षित ठिकाणी पोहोचत, पण दुष्काळामुळे नद्यांची पात्रेच्या पात्रे कोरडी पडल्याने जलचरांना स्थलांतरासाठी जागाच उरली नाही. डॉ. खेडकर म्हणाले की, भूपृष्ठावरील प्राणी बिकट परिस्थितीत स्थलांतर करू शकतात. जलचरांना मुळात पर्याय कमी असतात. ते ही संपले की, त्यांच्या अस्तित्वावरच कुर्‍हाड कोसळते. स्थलांतर करू न शकणार्‍या जलचरांना नष्टच व्हावे लागते. दोन महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यात बिंदुसरा नदीची पाहणी केली असता येथील जैवविविधता पूर्णपणे नष्ट झाल्याचे दिसून आले आहे.


त्रंबकेश्वर ते नांदेड या गोदावरीच्या पात्रात आढळलेल्या जाती
त्र्यंबकेश्वर 4
नाशिक 26
गंगापूर 13
कायगाव 37
पैठण 37
माजलगाव 14
गंगाखेड 6
नांदेड 42


माशांच्या सहा जातींची दुष्काळात आहुती!
गोदावरी नदीतील सहा माशांच्या जाती नष्ट होण्याच्या उंबरठय़ावर आहेत. कॅट फिश जातीतील मिस्टस कॅव्हिअस अर्थात कटारना किंवा सोंगाटा, स्ट्राँगिल्युरा अर्थात चोच मासा, आहेर, बॅगेरिअस अर्थात गोगरा, नेमॅशिलस मोनिलिस अर्थात चिंगळ्या, मुनवी या माशांच्या सहा जातींचा या दुष्काळात बळी जात आहे. त्यापैकी आहेर ही जात तर संपल्यातच जमा आहे. यापैकी काही जातींचे मासे देशात फार तर एक दोन ठिकाणी आढळतात. त्यामुळे त्यांना आणून पात्रात सोडले तर ती जात शिल्लक राहू शकते. आहेर तर भारतात फक्त गोदावरीतच सापडतो. मराठवाड्यात पैठण, माजलगाव, नांदेड येथे गोदावरीत आहेर मासा आढळतो.