आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्‍काळामुळे एकाही गावातून स्थलांतर झाले नाही, अधिकाऱ्यांचा बैठकीत दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - पैठण तालुक्यातून दुष्काळामुळे स्थलांतर होत असल्याची अफवाच असल्याचे शनिवारी तालुक्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवकाच्या बैठकीत स्पष्ट झाले असल्याची माहिती एसडीएम भाऊसाहेब जाधव यांनी दिली.  
 
उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार महेश सावंत, गट विकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, नायब तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत तालुक्यातील दुष्काळ, पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत तालुक्यातून रोजगाराअभावी स्थलांतर होत असल्याचा विषय येताच कुणीही दुष्काळामुळे स्थलांतर केले नाही असा तलाठ्यांचा सूर होता. प्रशासनाच्या वतीने  दर दोन महिन्यांनी तालुक्यातील आढावा बैठक होते यात विविध प्रश्नांवर चर्चा होते. ही कुठल्याही विशिष्ट विषयावर बैठक नसल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.  

प्रशासनाने शनिवारी संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्व तलाठी, ग्रामसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत तालुक्यातील रोजगार हमीचे काम मागेल त्याला रोजगार द्या, पाणीटंचाई दूर करण्याविषयी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. यात तालुक्यातील गावपातळीवरील दुष्काळी  परिस्थितीचा आढावा एसडीएम भाऊसाहेब जाधव यांनी घेतला.  प्रत्येक गावातील परिस्थिती दुष्काळामुळे गंभीर असल्याची बाब तलाठी, ग्रामसेवक यांनी सांगितले.  मात्र अद्याप तरी एकाही गावातून स्थलांतर झाले नसल्याचे तलाठी, ग्रामसेवकांनी सांगितले.  मात्र, ज्या एक दोन ठिकाणाहून नागरिक चितेगाव,औरंगाबाद, पैठण एमआयडीसीत रोजगारासाठी गेले त्याला स्थलांतर म्हणता येणार नाही, असे उपविभागीय अधिकारी जाधव यांनी स्पष्ट केले. तसेच इतर काही स्थलांतर झाले असेल ते हंगामी असेल त्याला स्थलांतर म्हणता येणार नसल्याचे जाधव यांनी सांगितले.  
 
या वेळी तहसीलदार महेश सावंत यांनी  मागेल त्याला रोजगार  उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले जात असून गावपातळीवर रोजगाराची मागणी करण्याच्या आवाहन त्यांनी  केले. शिवाय तलाठ्यांना गावात जाऊन दुष्काळाची पाहणी करण्याच्या सूचना केल्या. या बैठकीत पं. स. पाणीपुरवठा विभागाचे  सुधाकर काकडे, दशरथ खरात यांच्यासह सर्व अधिकारी- कर्मचारी उपस्थिती होते.  

दुष्काळी  स्थिती
पैठण तालुक्यात दुष्काळी स्थिती असून परिस्थिती गंभीर अाहे.  तरी यामुळे स्थलांतर झालेले नाही.  जे झाले असेल तर बोटावर मोजता येईल एवढेच झाले असण्याची शक्यता आहे.  मात्र तसे काहीही प्रशासनासमोर आले नाही.
- भाऊसाहेब जाधव, उपविभागीय अधिकारी
 
बातम्या आणखी आहेत...