आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To High Expenditure Univerisity's Deficit Budget

विद्यापीठाचा वाढीव खर्चामुळे तुटीचा अर्थसंकल्प

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 2013-14 च्या अर्थसंकल्पात गतवर्षीच्या तुलनेत दहापटीने खर्च वाढवून वित्तीय तूट दाखवली आहे. कुलगुरूंनी गतवर्षी 1 लाख 81 हजार 346 रुपयांचा स्वेच्छानिधी खर्च केला. यंदा मात्र वेगवेगळ्या दोन ‘हेड’मध्ये 40 लाख रुपयांच्या स्वेच्छानिधीची तरतूद केली आहे. त्याशिवाय अधिकार मंडळावरील सदस्यांना बैठकांसाठी स्वतंत्र वाहन देण्याचे सुनिश्चित असल्याने वित्तीय तूट निदर्शनास येत आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यापीठाने वित्तीय तुटीचा अर्थसंकल्प (14 मार्च 2013) अधिसभेत सादर केला. ही तूट भरून काढण्यासाठी पदाधिकारी आणि अधिकार्‍यांच्या खर्चात बचतीचे आकडे सादर करणे गरजेचे होते. त्यामुळे दृश्य स्वरूपात दिसणारी अकरा कोटींची तूट कमी करता आली असती. मात्र, प्रशासनाने 14 कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर करून उधळपट्टीचा मनसुबा दाखवल्याचा आरोप अधिसभा सदस्यांनी केला आहे. वर्षभरात 1 लाख 81 हजार 346 रुपयांचा स्वेच्छा निधी खर्च करणार्‍या कुलगुरूंनी यंदा स्वत:कडे दहा लाखांचा स्वेच्छानिधी राखून ठेवला. त्याचबरोबर दुसर्‍या ‘हेड’मध्ये तीस लाखांची तरतूद करण्यात आल्याचा आरोप अधिसभा सदस्य अण्णासाहेब खंदारे यांनी केला.
विद्यार्थ्यांच्या 1 आणि 2 क्रमांकाच्या वसतिगृहात, ग्रंथालयात पिण्याचे पाणी नाही, मग दुष्काळग्रस्त गावांना पाणी देण्याची भूमिका का घेण्यात आली.? असा सवालही खंदारे यांनी बैठकीत उपस्थित केला होता. विधी सल्ल्यासाठी मागील वर्षी 2 लाखांची तरतूद होती, यंदा मात्र 50 लाख रुपयांची तरतूद आहे. अर्थसंकल्प मांडणारे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शिवाजी मदन यांच्या मते न्यायालयीन खटले वाढत आहेत. त्यामुळे तरतूद वाढवणे गरजेचे आहे. विधी सल्लागार म्हणून काम पाहणार्‍या 40 वकिलांची यादी विद्यापीठाकडे असून त्यापैकी ठरावीक वकिलांनाच काम दिले जाते. त्यामुळे आपल्या र्मजीतील वकिलांचे खिसे भरण्याचा हा प्रकार असल्याचा गंभीर आरोपही खंदारे यांनी केला आहे.

प्रवासखर्चातही उधळपट्टी
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या कार्यकाळात एकाच ठिकाणाहून येणार्‍या प्रत्येकी तीन सदस्यांना प्रवासासाठी ‘वाहन भत्ता’ देण्यात येत होता. आता मात्र व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्या परिषद, परीक्षा मंडळ, अभ्यास मंडळ, अधिसभा सदस्य आणि सर्व अधिष्ठातांना येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र वाहन देण्यात येणार असल्याने 10 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे वित्तीय तूट नाही तर शिलकीचा अर्थसंकल्प दिसेल काय, असे विवेचन काही सदस्यांनी केले आहे.
शैक्षणिक खर्चात काटकसर नकोय
अर्थसंकल्पात विद्यार्थी हिताचे निर्णय व्हावेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात अजिबात काटकसर करता कामा नये. त्याऐवजी कुलगुरू, प्राध्यापक, अधिकार मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी काटकसर करणे अभिप्रेत आहे. सामान्य विद्यार्थ्यांशी अजिबात संबंध नसणार्‍या गोष्टींवर खर्च टाळण्याची सूचना आम्ही कुलगुरूंना केली आहे. त्यांनी मान्य करून दुरुस्ती करण्याचेही सांगितले. प्रत्यक्षात दुरुस्ती होते की नाही हे पुढील बैठकीत दिसेल. अण्णासाहेब खंदारे, अधिसभा सदस्य